लोकअदालतीत ४,४८९ खटले निकाली

By Admin | Updated: December 15, 2014 22:58 IST2014-12-15T22:58:42+5:302014-12-15T22:58:42+5:30

संपूर्ण राज्यात एकाच वेळी झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीच्या अनुषंगाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २५ हजार ८८५ प्रलंबित खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.

4,489 cases were filed in the public | लोकअदालतीत ४,४८९ खटले निकाली

लोकअदालतीत ४,४८९ खटले निकाली

जितेंद्र कालेकर, ठाणे
संपूर्ण राज्यात एकाच वेळी झालेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीच्या अनुषंगाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत २५ हजार ८८५ प्रलंबित खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार ४८९ खटल्यांचा ८२ न्यायाधीशांच्या पॅनलने दोन्ही पक्षकारांच्या तडजोडीनंतर अंतिम निकाल दिला. यात सर्वाधिक दोन हजार ४५ खटले ठाणे न्यायालयाने निकाली काढले.
संपूर्ण देशभरात ६ डिसेंबर २०१४ रोजी एकाच वेळी राष्ट्रीय महालोकअदालत पार पडली. महाराष्ट्रात मात्र काही कारणास्तव ती १३ डिसेंबर रोजी घेण्यात आली. ठाण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. आर. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी ११ ते
सायंकाळी ६ वा.च्या दरम्यान ही लोकअदालत पार पडली. न्यायालयीन प्रक्रियेत ठाण्याचे अद्यापही विभाजन झालेले नसल्याने ठाणे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत पालघर जिल्ह्यातही या लोकअदालतीचे आयोजन केले होते.
यामध्ये फौजदारी, सहकार तसेच दिवाणी स्वरूपाच्या चार हजार ४८९ खटल्यांचा अंतिम निकाल देण्यात आला. त्यातून बँका, महानगर टेलिफोन निगमसह इतर मोबाइल कंपन्या यांच्या बिलांबाबतचे वाद प्रिलीटीगेशन (वाद पूर्व निवाड्याकरिता) स्वरूपात तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापोटी तीन कोटी ६९ लाख ८३ हजार ५१७ इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तसेच मोटार अपघातांच्या ७२१ प्रकरणांपैकी २७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून विविध विमा कंपन्यांकडून १२
कोटी ६२ लाख ५३ हजार ६८ इतकी रक्कम नुकसानभरपाईपोटी वसूल करण्यात आली. ही
महालोकअदालत मोटार अपघातांच्या दाव्यांच्या तडजोडीसाठी संपूर्ण आठवडाभर म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत ठाण्यासह महाराष्ट्रभर सुरू राहणार आहे. तर १२ डिसेंबर रोजी झालेल्या विशेष मोहिमेत संपूर्ण जिल्ह्यातून जुने व प्रलंबित ११ हजार ३१६ प्रकरणे निकाली काढल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रत्नाकर साळगावकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठाण्यात
४ हजार ७२५ पैकी सर्वाधिक
म्हणजे दोन हजार ४५ खटल्यांचा निकाल देण्यात आला. उल्हासनगरमध्ये सर्वाधिक आठ हजार १६ प्रलंबिंत खटले या लोकअदालतीमध्ये न्यायदानासाठी ठेवण्यात आले होते. पैकी ६७३ खटल्यांचा तडजोडीअंती निकाल देण्यात आला.

Web Title: 4,489 cases were filed in the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.