४४ नगरसेवकांनी दडवली आयकर माहिती
By Admin | Updated: April 29, 2015 23:55 IST2015-04-29T23:55:09+5:302015-04-29T23:55:09+5:30
नवी मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या १०५ नगरसेवकांपैकी ६१ नगरसेवकांनी आयकराची माहिती दिली असून ४४ करोडपती नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रात ही माहिती देणे टाळले आहे.

४४ नगरसेवकांनी दडवली आयकर माहिती
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या १०५ नगरसेवकांपैकी ६१ नगरसेवकांनी आयकराची माहिती दिली असून ४४ करोडपती नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रात ही माहिती देणे टाळले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेचे नामदेव भगत, शुभांगी गवते आणि काँगे्रसच्या रूपाली निशांत भगत या पाच कोटींहून अधिक आहे. नामदेव भगत यांची मालमत्ता ३० कोटींहून अधिक तर शुभांगी गवते यांची १२ कोटी ५३ लाख आणि रूपाली भगत यांची मालमत्ता ११ कोटी ९१ लाखांहून अधिक आहे. यापैकी नामदेव भगत यांनी आपल्या पॅनकार्डचा तपशील दिला असून रूपाली भगत आणि शुभांगी गवतेंसह इतर ११ नगरसेवकांनी आपल्या पॅनकार्डचाही तपशील दडवला आहे. काँगे्रसच्या अनिता मानवतकर, शिवसेनेच्या भारती कोळी आणि नंदा काटे या तीन नगरसेविकांची एकूण मालमत्ता पाच लाखांहून कमी असल्याचे एडीआरने अहवालात म्हटले आहे.
महापालिकेत ७३ नगरसेवक करोडपती असले तरी यापैकी ९ जणांवर एक कोटीहून अधिक देणी आहे. पहिल्या तीनमध्ये भाजपाचे रामचंद्र घरत यांच्यावर चार कोटी ५१ लाख २३ हजार, राष्ट्रवादीच्या नेत्रा आशिष शिर्के यांच्यावर दोन कोटी ८३ लाख ८२ हजार आणि शिवसेनेचे किशोर पाटकर यांच्यावर २ कोटी २१ लाख ६० हजारांची देणी आहेत.
(खास प्रतिनिधी)