Join us  

४२ हजार होमगार्डची ५ महिन्यांपासून हेळसांड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 7:01 AM

राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

- जमीर काझीमुंबई : राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. होमगार्डच्या जवानांचे गेल्या सप्टेंबरपासूनचे १३७ कोटी ८३ लाखांचे मानधन थकले असून या आर्थिक वर्षअखेरपर्यंत आणखी १४० कोटी ५५ लाख रुपये म्हणजे एकूण २७८ कोटी ३८ लाखांची आवश्यकता लागणार आहे. मात्र महासमादेशक कार्यालयाकडे जवानांचे मानधन भागविण्यासाठी एक कवडीही शिल्लक नाही आहे. या निधीची पूर्तता करण्यासाठीचा प्रस्ताव महिनाभरापासून गृह विभागात पडून राहिला आहे. मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.विविध सण, उत्सव, निवडणुका, सभा, महोत्सवावेळी कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डही बंदोबस्तामध्ये तैनात असतात. मानसेवी तत्त्वावर राबत असलेल्या या जवानांची संख्या ५० हजारांवर आहे. त्यापैकी जवळपास ४२ हजारांवर प्रत्यक्षात ड्युटी बजावत आहेत. त्यांना मानधन देण्यासाठी दरवर्षी गृह विभागाकडून १०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. मात्र या वर्षी जुलैमध्ये त्यांचे मानधन प्रतिदिवस ३०० रुपयांवरून थेट ६७० इतके वाढविण्यात आले. अन्य राज्यांतील होमगार्डना दिल्या जाणाºया मानधनाच्या तुलनेत राज्यात अत्यल्प मानधन दिले जात असल्याने होमगार्डचे महासमादेशक संजय पाण्डेय यांनी गेल्या वर्षी तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा करून मानधनवाढीचा प्रस्ताव मंजूर केला होता. शासनाने मानधनवाढीला मंजुरी दिली तरी त्यासाठी लागणाºया अतिरिक्त निधीची तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे नवीन दराप्रमाणे जवानांच्या भत्त्याचे वाटप झाल्याने त्यासाठीचा निधी आॅगस्टअखेरपर्यंत खर्च झाला आहे. त्यानंतर सरकारकडून निधीच न मिळाल्याने त्यांना सप्टेंबरपासून एका फुटक्या कवडीचेही वाटप करण्यात आलेले नाही. सप्टेंबरपासून महिन्यातील थकीत मानधन १३७ कोटी ८२ लाख ९६०७५ इतके आहे.विधानसभा निवडणुका, अतिवृष्टीसारख्या आपत्तींना सामोरे जाताना होमगार्डंनी थकीत मानधनाची पर्वा न करता सुरक्षारक्षकाची भूमिका जबाबदारीने पार पाडली. मात्र सरकार स्थापनेचे त्रांगडे आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची अवस्था बिकट आहे. उधार उसनवार करून ते आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत.दरम्यान, होमगार्डच्या थकीत मानधनाच्या प्रस्तावाबाबत गृह सचिव संजय कुमार यांच्याशी मोबाइलवर मेसेज करून विचारणा केली असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.होमगार्डच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यताएक, दोन नव्हे तर तब्बल पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित असलेल्या ४२ हजारांवर होमगार्डच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भत्ता आज मिळेल, उद्या मिळेल या आशेपोटी ते परिचित, मित्रमंडळी व शेजारपाजाऱ्यांकडे उधार उसनवार आणि छोटी-मोठी कामे करीत स्वत:चा व कुटुंबीयांचा खर्च चालवत आहेत. मात्र आता इतरांकडून पैसे मिळणे दुरापास्त झाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे, त्यामुळे शासनाने त्यांचे थकलेले मानधन त्वरित न दिल्यास कोणत्याही क्षणी त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.थकीत भत्त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावाराज्यभरातील होमगार्डचे थकीत मानधन मिळण्यासाठी आपण गृह विभागाकडे पाठपुरावा करीत असून शासनही सकारात्मक असून लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळेल. मार्चपर्यंत आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊ, त्यांच्या हक्काची पूर्तता केली जाईल.- संजय पाण्डेय, महासमादेशक, होमगार्ड

टॅग्स :महाराष्ट्र सरकारमुंबई