Join us  

'मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार अन् ST चालकाला 12 हजार, हे बरोबर नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:11 PM

मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीवरील ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच आहे.

ठळक मुद्देआम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - राज्यात जवळपास गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने 41 टक्के पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही आपला संप मागे घेतला नाही. त्यामुळे, राज्यातील कोट्यवधी जनतेची गैरसोय होत असून विलीगीकरनाचा निर्णय घेतल्याशिवाय आपण आझाद मैदाना सोडणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आता, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढल्या पाहिजेत, असे म्हणताना संप मागे घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीवरील ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच आहे. जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

200 कर्मचारी आझाद मैदानावर 

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात एसटीचे दोनशे कर्मचारी अद्यापही आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. अक्कलकोट येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्हाला राज्य सरकारकडून कारवाईची भीती दाखवली जात आहे. पण कारवाई आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही आतापर्यंत कारवाईतच जगत आलो आहोत. त्यामुळे कितीही कारवाई झाली तरी आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. राजगुरू नगर आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले की, विलीनीकरणाच्या मागणीवर सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. उलट आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा, एसटी विरोधात आंदोलन, जनतेला वेठीस धरल्याबद्दल निलंबित केल्याचे सांगितले आहे.

आतापर्यंत ७५८५ निलंबित तर १७७९ जणांची सेवा समाप्त

एसटी महामंडळाचा संपातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. सोमवारी २५४ जणांची सेवा समाप्ती केली असून आतापर्यंत सेवासमाप्ती केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या १७७९ झाली आहे तर १०८८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई असून एकूण ७५८५ जणांना निलंबित केले आहे. 

टॅग्स :मुंबईबच्चू कडू