लग्न समारंभातून लुबाडले ४० तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST2021-02-05T04:24:23+5:302021-02-05T04:24:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या अजयसिंग कोंडाणा (२२) आणि ...

40 ounces of gold stolen from wedding ceremony | लग्न समारंभातून लुबाडले ४० तोळे सोने

लग्न समारंभातून लुबाडले ४० तोळे सोने

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या अजयसिंग कोंडाणा (२२) आणि बादल सिसोदिया (२०, रा. गुलखेडी, मध्य प्रदेश) या दोघांनाही मध्य प्रदेशातून कासारवडवली पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

घोडबंदर रोड, ओवळा येथे ३० नोव्हेंबर २०२० रोजी अनिता सिंग यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू असताना अनिता यांनी फोटो काढण्याच्या वेळी त्यांची पर्स खुर्चीवर ठेवली होती. हीच संधी साधत एका लहान मुलाच्या मदतीने चोरट्यांनी ४२३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि काही रोकड असलेली पर्स अवघ्या काही मिनिटांमध्ये लंपास केली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, जयराज रणवरे, अविनाश काळदाते आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे तसेच सागर जाधव यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील राजगढ येथून बबलू सिसोदिया याच्या घरातून १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे ४२३ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर २७ जानेवारी रोजी अजयसिंग आणि बादल या दोघांना अटक केली. या गुन्ह्यात कासारवडवली पोलिसांनी १७ लाख ५७ हजार ९७० रुपयांचे ४० तोळ्यांचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले.

Web Title: 40 ounces of gold stolen from wedding ceremony