मुंबई : पावसाळ्यापूर्वी महापालिकेने ४९९ इमारती धोकादायक ठरविल्या होत्या. यापैकी आतापर्यंत ६८ इमारती खाली करण्यात आल्या आहेत, तर ६५ इमारतींचे वीज व पाणी खंडित केले आहे. मात्र, अद्यापही सुमारे चारशे इमारतींमधील हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. गेले काही दिवस मुंबईमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगरी येथील दुर्घटनेनंतर या रहिवाशांचा काळजाचा ठोका चुकला.पावसाळ्यापूर्वी महापालिका आणि म्हाडा संयुक्तपणे सर्वेक्षण करून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतात. गेल्या वर्षी ६१९ इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या. या वर्षी या संख्येत घट होऊन ४९९ इमारती धोकादायक ठरल्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळण्याची दुर्घटना घडत असते. त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मे महिन्यात सर्व विभाग अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत केवळ १३५ इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटीस देऊन चेतावणी देण्यात येते. मोक्याची जागा, डोक्यावर छप्पर आणि नोकरीधंदा व मुलांच्या शाळा अशा अडचणी पुढे करीत रहिवासी इमारत खाली करीत नाहीत. त्यामुळे बळाचा वापर करून इमारत खाली करून घेण्याचा पर्याय तेवढा उरतो, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.
४९९ इमारतींमध्ये रहिवाशांचे जीव टांगणीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 01:32 IST