ई-संजीवनी ओपीडीचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST2021-05-01T04:06:02+5:302021-05-01T04:06:02+5:30

गृह विलगीकरणातील बाधितही घेतात आरोग्य सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी ...

38,000 patients benefited from e-resuscitation OPD | ई-संजीवनी ओपीडीचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

ई-संजीवनी ओपीडीचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

गृह विलगीकरणातील बाधितही घेतात आरोग्य सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेचा महाराष्ट्रातील ३७ हजार ८९१ रुग्णांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे घरीच उपचार घेणाऱ्या विलगीकरणातील कोरोनाबाधितही या सेवेचा लाभ घेत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय उपचार आणि सल्ला मिळावा यासाठी १३ एप्रिल २०२० रोजी ऑनलाइन ई-संजीवनी सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला संकेतस्थळावरून ही सेवा घेण्याची सोय उपलब्ध होती. त्यानंतर त्याचे मोबाइल ॲपही विकसित करण्यात आले. ई-संजीवनी ओपीडी सेवा मोफत आहे. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आली आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्ला देतात.

दररोज सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ या वेळेत ही सेवा घेता येते. रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर करून घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आजाराबाबत सल्ला घेता येतो. ई-संजीवनी ओपीडी सेवेमार्फत रुग्णांना सल्ला दिल्यानंतर एसएमएसद्वारे ई-प्रिस्क्रिप्शन दिले जाते. त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात.

* असा साधा संपर्क

ई-संजीवनी ओपीडीसाठी esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येते. तर, ॲन्ड्रॉइड मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन esanjeevani OPD National Telconsultation Service या नावाने देण्यात आलेले ॲप्लिकेशन डाऊनलोड करूनही या सेवेचा लाभ घेता येऊ शकताे.

---------------------

Web Title: 38,000 patients benefited from e-resuscitation OPD