Join us  

शहरात आगीच्या घटनांमध्ये वर्षभरात ३७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 5:46 AM

मुंबईत वर्षभरात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. ही आकडेवारी आॅक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ मधील आहे.

मुंबई : मुंबईत वर्षभरात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. ही आकडेवारी आॅक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ मधील आहे. त्यानंतरही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अंधेरी येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीत लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी या अहवालावरून मुंबईकर अग्निसुरक्षेबाबत दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.गेल्या चार वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने पाच हजार २०० इमारतींची पाहणी केली. यामध्ये ५० टक्के इमारती नियम मोडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. आगीच्या वाढत्या घटनांनीही धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबईत आॅक्टोबर ते एप्रिल या सात महिन्यांत ३४२५ दुर्घटना घडल्या. यामध्ये अडीच हजार घटना आगीशी संबंधित असून यात ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.अग्निशमन दलाकडूनवारंवार सूचना करूनही उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे दिसून येतआहे. अग्निशमन दलाच्या शिड्या केवळ २८ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यावरील मजल्यांवर मदतकार्यासाठी आगीचा अंदाज, घटनेची तीव्रता व स्वरूप कळणे आवश्यक आहे. अशा वेळी स्थितीचा आढावा घेत कमी वेळेत उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेरा बसविण्याची मागणी होत आहे.मालाडमधील मॉलमध्ये आगमालाडच्या एका मॉलमध्ये मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.मालाड पूर्वेच्या दप्तरी रोडवर सेंट्रल प्लाझा मॉल आहे. मंगळवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली. याबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना स्थानिकांनी फोन करून कळविले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी १च्या सुमारास आग विझविण्यात आली. या आगीत काही प्रमाणात सामान आणि फर्निचरचे नुकसान झाले असले, तरी जीवितहानी झालेली नाही. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीच्या नेमक्या कारणांचा शोध अग्निशमन दल घेत आहे.- १ आॅक्टोबर २०१७ ते ३० एप्रिल २०१८ या सात महिन्यांदरम्यान विविध दुर्घटनांमध्ये १३० जण जखमी झाले असून ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे.- सर्वाधिक बळी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कमला मिल येथील आगीत नोंदवले गेले आहेत. या आगीत१४ जणांचा मृत्यू झाला होता. तर एप्रिल महिन्यात लागलेल्या विविध आगीमध्ये १० जणांचा मृत्यूझाला आहे.- चुकीच्या पद्धतीची विजेची वायरिंग आग लागण्यास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :आग