Join us  

तीन दिवसांत तब्बल 3.62 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 8:26 AM

बुधवारीही शेअर बाजारात सेन्सेक्स 169.45 अंक (0.45%) आणि निफ्टी 44.55 अंक (0.39%) ची घसरण झाली.

नवी दिल्ली : भारतीय रुपयाप्रमाणेच शेअर बाजाराचीही घसरगुंडी सुरुच असून या आठवड्याच्या मागील तीन दिवसांत तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारीही शेअर बाजारात सेन्सेक्स 169.45 अंक (0.45%) आणि निफ्टी 44.55 अंक (0.39%) ची घसरण झाली.

बुधवारी सेन्सेक्स सुमारे दोन महिन्यांच्या निचतम पातळीवर आला. रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध यामुळे सोमवारी 970 अंकांनी घसरण झाली होती. यामुळे मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांची संपत्ती 3 लाख 62 हजार 357.15 कोटींनी घटून 1 कोटी 52 लाख 73 हजार 265 कोटी रुपयांवर आली. 

अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वधारणार आहेत. तर रुपयाचीही घसरण होणार आहे. या घडामोटींचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. यामुळे शेअर विक्रीचा दबाव त्यांच्यावर पडणार असल्याचे काही जाणकारांनी सांगितले. 

सेन्सेक्सच्या पहिल्या 30 समभागांपैकी 16 समभाग घसरले तर 14 समभागांमध्ये वाढ झाली. इंडसइंड बँक, मारुती सुझुकी इंडिया, एचडीएफसी बँक सारख्या शेअरमध्ये घसरण झाली. तर कोल इंडिया, ओएनजीसी, टाटा स्टील आणि हिरो मोटोकॉर्पच्या समभागांनी चांगले प्रदर्शन केले. तर मुंबई शेअर बाजारात 1704 शेअर घसरले. तर 968 शेअरमध्ये वाढ झाली. 173 शेअर्सच्या दरात कोणताही बदल झाला नाही. बुधावारी बीएसईच्या 180 शेअरनी 52 आठवड्यांतील खालची पातळी गाठली होती. 

टॅग्स :शेअर बाजारमुंबईनिर्देशांकनिफ्टी