३५४ मशालींनी उजळला प्रतापगड
By Admin | Updated: September 29, 2014 00:24 IST2014-09-29T00:24:29+5:302014-09-29T00:24:29+5:30
किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने गडावर कट्टर शिवभक्त आप्पासाहेब उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

३५४ मशालींनी उजळला प्रतापगड
पोलादपूर : किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने गडावर कट्टर शिवभक्त आप्पासाहेब उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रतिवर्षी चतुर्थीच्या रात्री शिवप्रताप बुरूज ते भवानी माता मंदिराच्या तटबंदीपर्यंत मशाली प्रज्वलित करून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
काल शनिवारी चतुर्थीच्या मुहूर्तावर भवानी माता मंदिरातून मशाल प्रज्वलित करून खास पंचवीस मावळे शिवकाळातील पोशाख घालून शिवप्रताप बुरूजाकडे धावले. हरहर महादेव, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणा देत मशाली प्रज्वलित करण्याचे काम सुरू झाले. बघता बघता ३५४ मशाली प्रज्वलित झाल्या अन् अवघा प्रतापगड मशालीच्या उजेडात न्हाऊन निघाला. साक्षात आई भवानी प्रतापगडाचे हे वेगळे रूप न्याहाळत असावी.
यावर्षी हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किल्ले प्रतापगड वरील स्वराज्य ढोल पथकाने ढोल-ताशांच्या गजराने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कविभूषण यांच्या काव्याच्या पंगती तालबद्ध पध्दतीने वाजवून सर्व शिवभक्तांना शिवकाळात नेऊन ठेवले. त्यानंतर भवानी माता मंदिरात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. शिवरायांचे सेवक विश्वनाथ भट यांचे वंशज श्री हडप यांनी मंत्राच्या घोषात महाआरती केली.