Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलेट ट्रेन’साठी ३५० टनाचा कटरहेड विक्रोळी शाफ्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:42 IST

मुंबईतील २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गापैकी १६ किलोमीटर भागाच्या बांधकामासाठी दोन टनेल बोरिंग मशीन यंत्रांची उभारणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीनचा पहिला कटरहेड यशस्वीरित्या शाफ्टमध्ये उतरवण्यात आला. १३.६ मीटर व्यास आणि सुमारे ३५० टन वजन असलेला हा कटरहेड टनेल बोरिंग मशीनच्या मुख्य शिल्डच्या प्राथमिक असेंब्लीचा भाग आहे.

मुंबईतील २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गापैकी १६ किलोमीटर भागाच्या बांधकामासाठी दोन टनेल बोरिंग मशीन यंत्रांची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे खाडीखाली उभारण्यात येणाऱ्या ७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचाही समावेश आहे. हा भारतातील पहिला समुद्राखालून जाणारा रेल्वे बोगदा असणार आहे. प्रत्येक टनेल बोरिंग मशीनचे वजन ३ हजार टनांहून अधिक असून, रेल्वे बोगदा बांधकामासाठी देशात आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या यंत्रांमध्ये त्यांची गणना होते.

असा होणार टनेल बोरिंग मशिनचा प्रवास
ही मशीन विक्रोळीपासून सुमारे ६ किलोमीटरचा प्रवास करत शहरी भाग आणि मिठी नदीखालून मार्गक्रमण करत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील उभारण्यात येत असलेल्या मुंबई बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचणार आहे. तेथे मशीन बाहेर काढण्यात येईल.

सुरक्षित खोदकाम आणि परिसरातील संरचनांवर परिणाम होऊ नये यासाठी विविध अत्याधुनिक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. यामध्ये सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर्स, टिल्ट मीटर्स, सूक्ष्म ताण मोजण्यासाठी स्ट्रेन गेज तसेच कंपन आणि भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी सिस्मोग्राफ यांचा समावेश आहे.

कटर डिस्क हे मुख्य उपकरण असून, ते खडक कापण्याचे काम करतात. त्यानंतर स्क्रेपरच्या मदतीने मलबा हटवला जातो.

१३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड इतका मोठा बोगदा खोदू शकतो की, त्यामध्ये हाय-स्पीड कॉरिडॉरच्या अप आणि डाउन अशा दोन्ही रेल्वे मार्गांचा समावेश होईल.

१,६०० किलोग्राम उच्च-प्रेसिजन वेल्डिंगद्वारे त्याची जोडणी करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bullet Train: Cutterhead lowered into Vikhroli shaft for Mumbai-Ahmedabad project.

Web Summary : A major milestone: the first cutterhead for the Mumbai-Ahmedabad bullet train's tunnel boring machine has been successfully lowered into a Vikhroli shaft. This massive machine will bore through urban areas and under the Mithi River towards BKC.
टॅग्स :बुलेट ट्रेन