Join us

भाईंदरमध्ये महिलांनी बनविला ३५ फूट झाडू; इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:43 IST

मीरा-भार्इंदर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या १० महिलांनी विल इंडिया चेंज फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ३५ फूट झाडू बनविला.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या १० महिलांनी विल इंडिया चेंज फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरीकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ३५ फूट झाडू बनविला. यानिमित्ताने शनिवारी मॅक्सेस मॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते त्या झाडूची इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे जाहिर करण्यात आले.

यावेळी नगरसेवक सुरेश खंडेलवाल, डॉ. सुशील अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. हा झाडू बनविण्यासाठी गाला ब्रुम कंपनीने शेकडो झाडू त्या महिलांना मोफत दिल्याचे सांगण्यात आले. अवघ्या १ तास १५ मिनिटांत त्या महिलांनी सुहासिनी साकीर यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ फूटी झाडू साकारला. हा झाडू बनविण्यामागे सरकारच्या स्वच्छता अभियानाला सहकार्य करण्याचा हेतु असल्याचे आयोजकांकडुन सांगण्यात आले. हा झाडू तयार करणाऱ्या महिलांचा गौरव करताना महापौरांनी स्वच्छता ही निमित्त मात्र न ठरता प्रत्येक दिवस स्वच्छतेचाच असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्या घराप्रमाणे परिसरात स्वच्छता राखल्यास खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ सुंदर, मीरा-भार्इंदर’ हि संकल्पना सत्यात उतरेल, अशी आशा व्यक्त केली. शेवटी त्यांनी उपस्थितांना, मीरा-भार्इंदर शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवुन देण्यासाठी सर्वांना स्वच्छता मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले.