Join us  

'32 परीक्षार्थींना कोरोनाची लागण, तरीही भाजपाकडून कोट्यवधींच्या जीवाची 'परीक्षा' का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:49 PM

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देदेशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे.

मुंबई - भारत कोरोना संसर्ग असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर गेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेणे हे त्यांच्या आणि परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांची सध्याची मानसिकता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्र लिहिले आहे. तर, शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी कर्नाटकचा दाखला देत केंद्र सरकाराला प्रश्न विचारला आहे.

देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 7 लाखांच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18 हजारांपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमध्ये, परीक्षा दिल्यानंतर तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कर्नाटकमधील 32 विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली आहे. तसेच, कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार असूनही देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या जावाची परीक्षा भाजपा का घेतंय? असा प्रश्न वरुण यांनी विचारला आहे. तसेच, केंद्र सरकारच्या निर्णयालाही त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 

कर्नाटकामध्ये जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 25 जून पासून ही परीक्षा सुरू झाली होती. मात्र परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची घटना समोर आली होती.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अशक्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांना स्पष्ट केले. परीक्षा घेण्याच्या या कार्यात शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, इतर आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळ यांचा जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच शिक्षण संस्था, महाविद्यालये ही कोरोना केंद्रांच्या कामासाठी वापरली जात आहेत. परीक्षा घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मूळ गावाहून परीक्षांच्या ठिकाणी प्रवास करावा लागणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा घेणे, जीवघेणे ठरू शकते, असे सामंत यांनी म्हटले आहे. यूजीसीच्या सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता त्या बंधनकारक नसल्या तरी अंमलबजावणी शक्य नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद करीत नवीन सूचना जाहीर करण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :परीक्षाशिवसेनामुंबईकर्नाटकभाजपा