Join us  

अठरा वयोगटापर्यंतच्या ३२ तपासण्या होणार मोफत; केंद्राची ‘आयुष्मान भव मोहीम’ राबविण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 12:24 PM

‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्र सरकारची आयुष्मान भव मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी ही मोहीम महत्त्वाचे पाऊल आहे. मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्या दरम्यान लहानांपासून अठरा वयोगटापर्यंतच्या ३२ आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. 

‘आयुष्मान आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. यानुषंगाने या उपक्रमांतर्गत सर्व जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा या उपक्रमांत आरोग्य सेवा सुविधांची जनजगृती करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आयुष्मान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती करणे, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग इत्यादींबाबत जनजगृती करणे.

या मेळाव्यात सर्व समावेश आरोग्य सेवा, आयुष, मानसिक रोग, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व  घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योग व वेलनेस उपक्रम, मोफत औषधे, प्रयोगशाळा तपासणी, तसेच टेलिकन्सल्टेशनद्वारे सेवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडीतील आणि  प्राथमिक शाळांमधील मुलांची (० ते १८ वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ० ते १८ वयोगटातील चार डी, (डिफेक्ट्स ऑफ बर्थ, डेव्हलपमेंट डीलेज, डेफिशियन्सीज आणि डिसीजेस) करिता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पालिका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. १ ते १७ सप्टेंबरदरम्यान आरोग्य संस्थांमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. 

आम्हाला राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक मिळाले आहे. त्यानुसार आम्ही आमच्याकडे कार्यशाळा आयोजित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  - डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई पालिका

या सभेत आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे. प्रधान मंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत  संलग्न रुग्णालयाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच आयुष्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :आरोग्यडॉक्टर