धारावी पुनर्विकास प्रकल्पावर १५ वर्षात ३१.२७ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:18+5:302021-02-05T04:29:18+5:30
लोकमत न्यूज़ नेटवर्क मुंबई - धारावीच्या विकासाबाबतचे काम कासवगती असले तरी त्यावरील खर्च मात्र सुसाट वेगाने सुरू आहे. गेल्या ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर १५ वर्षात ३१.२७ कोटी खर्च
लोकमत न्यूज़ नेटवर्क
मुंबई - धारावीच्या विकासाबाबतचे काम कासवगती असले तरी त्यावरील खर्च मात्र सुसाट वेगाने सुरू आहे. गेल्या १५ वर्षात धारावी पुनर्विकास प्रकल्पावर तब्बल ३१ कोटी २७ लाख खर्च झाले आहेत. दस्तुरखुद्द झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्याबाबतची कबुली दिली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील माहिती अधिकार कायद्यानव्ये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितला होता. त्यामध्ये कळविण्यात आले की,१ एप्रिल २००५ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत ३१ कोटी २७ लाख ६६ हजार १४८ रूपये धारावी पुनर्विकास प्रकल्पावर खर्च करण्यात आले. पीएमसी शुल्कावर १५.८५कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. यात जाहिराती आणि प्रसारावर ३.६५ कोटी ,व्यवसायिक शुल्क आणि सर्वेवर ४.१४ कोटी खर्च झाले आहेत. विधी शुल्कावर २.२७ कोटी खर्च करण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) चा शासन निर्णय फेब्रुवारी २००४ रोजी जारी करण्यात आला. मागील १७ वर्षात एकही इंचाचा पुनर्विकास झालेला नाही. खाजगी विकासकाऐवजी शासनाने धारावीचा पुनर्विकास केला तर मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण साठा निर्माण होईल आणि शासनाची तिजोरी भरेल, असे सांगत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठविले आहे.