३१ हजार ग्राहक गॅसवर
By Admin | Updated: April 1, 2015 22:19 IST2015-04-01T22:19:27+5:302015-04-01T22:19:27+5:30
गॅसचे अनुदान बुधवारपासून ग्राहकांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ८५ टक्के ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते

३१ हजार ग्राहक गॅसवर
पनवेल : गॅसचे अनुदान बुधवारपासून ग्राहकांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ८५ टक्के ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून कागदपत्रे एजन्सीकडे जमा करून लिंकिंग करून घेतले आहे. मात्र अद्यापही पनवेल तालुक्यातील ३१ हजार ग्राहकांच्या बँकेचे खाते आणि गॅसकार्डची जोडणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित ग्राहकांची अनुदानाकरिता धावपळ सुरूच आहे. ज्यांचे लिंकिंग झालेली नाही त्यांना आता सर्व पैसे मोजावे लागणार आहेत.
शासनाने गॅस सिलिंडरवर अनुदान देण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साधारणपणे ४५० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी १ हजार २०० रुपये मोजावे लागतील. त्यापैकी ग्राहकांना ७०० रुपये परत मिळतील. परंतु हे अनुदान त्यांना रोख मिळणार नसून, ते बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ही योजना एक जानेवारीपासून लागू करण्यात आली होती. मात्र बहुतांशी ग्राहकांचे लिंकिंग झाले नसल्याने १ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात गॅस एजन्सीत जाऊन ग्राहकांनी कागदपत्रे जमा केली. तत्पूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने बँक खाते व गॅसकार्डचे लिंकिंग करून घेण्याच्या सूचना गॅस एजन्सीधारकांना केल्या होत्या. एजन्सीधारकांकडून त्यासाठी मागील महिन्यात ग्राहकांचे अर्ज भरून घेतले.
शहरासह नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तालुक्यात २१६१७४ गॅस ग्राहक असून ही संख्या मोठी आहे. त्यापैकी १ एप्रिलपर्यंत १८४७७७ ग्राहकांचे ग्राहकांचे लिंकिंग झाले आहे. अनुदान मिळविण्यासाठी बँकेचे सोपस्कार पार करणे ग्राहकांवर बंधनकारक होते. मात्र काही ग्राहकांनी अद्यापही बँकेत खाते उघडले नाही, तर काहींनी आपले खाते आणि गॅसकार्डचे लिंकिंग केले नाही. ही संख्या जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त आहे. १ एप्रिलपासून ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली असल्याने ज्यांचे लिंकिंग झाले नाही ते गॅसवर आले आहेत.