३०० सिझर १२०० नैसर्गिक प्रसूती
By Admin | Updated: March 12, 2015 23:03 IST2015-03-12T23:03:00+5:302015-03-12T23:03:00+5:30
डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या सहा वर्षापासून स्त्रीरोगतज डॉक्टर अभावी येथील गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य गरोदर महिलांचे
३०० सिझर १२०० नैसर्गिक प्रसूती
डहाणू : डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या सहा वर्षापासून स्त्रीरोगतज डॉक्टर अभावी येथील गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य गरोदर महिलांचे प्रसूतीसाठी हाल होत होते. गरोदर महिलांना सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी रात्रीबेरात्री वापी, बलसाड, ठाणे तसेच मुंबईच्या शासकीय रूग्णालयात तातडीने जावे लागत होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला रात्रभर जागण्याची वेळ येत होती. परंतु वर्षभरापासून उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नंदिनी देशमुख तसेच डॉ. केतकी पाटील यांची नियुक्ती झाल्याने येथील हजारो महिलांना दिलासा मिळाला आहे. गेल्या एक वर्षात उपजिल्हा रूग्णालयात १२०० गरोदर महिलांची नैसर्गिक (नॉर्मल) प्रसूती करण्यात आल्यात. तर ३०० सिझेरियन यशस्वीपणे पार पडल्याने डहाणूच्या खेड्योपाड्यातून तसेच ग्रामीण शहरी भागातून मोठ्या प्रमाणात आदिवासी तसेच सर्वसामान्य गरोदर महिला प्रसूतीसाठी उपजिल्हा रूग्णालयात येत आहे.
चार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची लोकवस्ती असून येथे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून कासा येथे ग्रामीण तर डहाणू येथे उपजिल्हा रूग्णालये आहेत. येथील मोल मजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना खाजगी दवाखान्यात जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने सुमारे नव्वद टक्के आदिवासी कुटुंबे शासकीय रूग्णालयावरच अवलंबून असतात. परंतु डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात गेल्या सहा वर्षापासून स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ, नसल्याने दऱ्याखोऱ्यात डोंगरकुशीत राहणाऱ्या गरोदर महिलांना प्रसूतीसाठी ठाणे, मुंबई तसेच गुजरातच्या वापी, बलसाडच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येत होते. अनेक वेळा तर रस्त्यातून जात असतानाच आई किवां बाळ दगावण्याची घटना घडली आहे. त्यामुळे नाईलाजाने शेकडो आदिवासी कुटुंबे कर्जबाजारी होऊन खाजगी रूग्णालयात सिझेरिनसाठी दाखल होत होते. डहाण्ूा तसेच परिसरात गर्भवतींना सिझरसाठी कमीतकमी पस्तीस हजार मोजावे लागते.
दरम्यान डहाणू उपजिल्हा रूग्णालयात एक वर्षापासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी देशमुख रूजू झाल्यापासून गोरगरीब दारिद्र्य रेषेखालील आदिवासी महिलांना मोठा आधार झाला आहे. विशेष म्हणजे येथील रूग्णालयात गरोदर महिलांची नैसर्गिक किंवा सिझेरिन शस्त्रक्रिया दरम्यान लागणारे साहित्य, औषध, मोफत दिले जाते. शिवाय गरोदरमाता तसेच नवजात अर्भकास तीस दिवसापर्यंतच्या सर्व रक्त तपासण्या, औषधे, बरोबरच प्रसूतीसाठी घरून येण्यासाठी तर प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी मोफत वाहनाची सोय असल्याने डहाणूचा उपजिल्हा रूग्णालय आदिवासी गरोदर महिलेसाठी एक वरदानच असल्याचे सांगितले जाते.
येथील मेडिकल सुपरिटेन्डन्ट डॉ. संजय बोदाडे हे देखील सेवाभावी वृत्तीचे असल्याने सध्या डहाणूच्या उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील रूग्णांची गर्दी पहावयास मिळत आहे.