मालवणीत ३० बांधकामे पाडली
By Admin | Updated: January 18, 2015 01:40 IST2015-01-18T01:40:13+5:302015-01-18T01:40:13+5:30
बेकायदा बांधकामांचा अड्डाच असलेल्या मालाड आणि मालवणीत अखेर पालिकेच्या कारवाईने वेग घेतला आहे़

मालवणीत ३० बांधकामे पाडली
मुंबई : बेकायदा बांधकामांचा अड्डाच असलेल्या मालाड आणि मालवणीत अखेर पालिकेच्या कारवाईने वेग घेतला आहे़ गेल्या १० दिवसांमध्ये ३० हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत़ विशेष म्हणजे पोलीस बळ न वापरता पी उत्तर विभाग कार्यालयानेच या कारवाया केल्या आहेत़
बेकायदा बांधकामांवरील कारवाई अनेक वेळा पोलीस संरक्षणाअभावी लांबणीवर पडते़ कारवाईसाठी पालिकेकडून स्थानिक पोलीस ठाण्याकडे अर्ज करण्यात येतो़ मात्र अनेकदा बंदोबस्त व्यग्र असल्यामुळे पोलिसांचे संरक्षण मिळत नाही़ मालाड आणि मालवणीतील बेकायदा बांधकामांवरील कारवाई पोलीस संरक्षणाअभावीच अनेक महिने लटकली होती़
या वॉर्डात बहुतांशी अतिक्रमणे ही मोकळ्या भूखंडांवर होती़ त्यावर कारवाईसाठी पोलीस बळ मिळण्याची प्रतीक्षा पी उत्तर विभाग कार्यालयाने केली.
बराच काळ संरक्षण न मिळाल्यामुळे या विभागाने पोलीस संरक्षणविना स्वबळावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला़ या कारवाईनंतर नवीन झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची खबरदारीही पालिका घेत आहे़ (प्रतिनिधी)
बेकायदा वस्त्या
पालिकेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुंबईत ५६ हजार बेकायदा बांधकामे आहेत़ बेकायदा बांधकामांवर वॉच ठेवण्यासाठी विभाग पातळीवर स्वतंत्र अधिकारीही नेमण्यात आले आहेत़ अशी बांधकामे आढळल्यास तत्काळ कारवाईचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत़