शहरात ३ हजार ७०० बॅलेट युनिट
By Admin | Updated: October 8, 2014 23:14 IST2014-10-08T23:14:22+5:302014-10-08T23:14:22+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून, उमेदवारांची यादीही निश्चित झाली आहे.

शहरात ३ हजार ७०० बॅलेट युनिट
चेतन ननावरे, मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून, उमेदवारांची यादीही निश्चित झाली आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार व्होटिंग मशिनची संख्या ठरवण्यात आली आहे. त्याप्रमाणे शहरातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी ३ हजार १३० कंट्रोल युनिट आणि ३ हजार ७०० बॅलेट युनिट्स पुरवण्यात आले आहेत.
सामान्यत: एका व्होटिंग मशिनमध्ये एक कंट्रोल युनिट व एका बॅलेट युनिटचा समावेश असतो. प्रत्येक बॅलेटमध्ये कमाल १५ उमेदवारांच्या नावांसह नोटाचा पर्याय समाविष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे पंधराहून अधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघात दोन बॅलेट युनिटची आवश्यकता असते. एका कंट्रोल युनिटमध्ये ४ बॅलेट युनिटमधील मते मोजण्याची क्षमता असल्याने बॅलेट युनिटच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असली, तरी कंट्रोल युनिटची संख्या ‘जैसे थे’ आहे.
शहरातील मलबार हिल आणि मुंबादेवी या दोन मतदारसंघांत पंधराहून अधिक उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या बॅलेट युनिटची संख्या दुपटीने वाढली आहे. मलबार हिलमध्ये सर्वाधिक म्हणजेच २३ उमेदवार रिंगणात असून, मुंबादेवीत १८ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम राखली आहे. त्यामुळे मलबारहिलमध्ये ३३० कंट्रोल युनिटसह ६३० बॅलेट युनिटचा पुरवठा केला आहे. तर मुंबादेवीसाठी ३०० कंट्रोल युनिटसोबत ५७० बॅलेट युनिट पुरवण्यात आले आहेत.