Join us
Daily Top 2Weekly Top 5

३ मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद, २ किमीचा वळसा वाचला; भांडुपमध्ये ७५ अनधिकृत बांधकामं पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:29 IST

भांडुप पश्चिम परिसरातील कक्कैया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत पालिकेने बांधकामे बुधवारी जमीनदोस्त केल्याने हा आक्रसलेला रस्ता आता मोकळा झाला आहे.

मुंबई :

भांडुप पश्चिम परिसरातील कक्कैया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत पालिकेने बांधकामे बुधवारी जमीनदोस्त केल्याने हा आक्रसलेला रस्ता आता मोकळा झाला आहे. या कारवाईनंतर हा रस्ता ३ मीटरवरून १८ मीटरपर्यंत रुंद झाला आहे. त्यामुळे स्थानिकांचा दोन किलोमीटरचा फेराही कमी झाल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत ६२ घरे आणि १३ दुकाने पाडण्यात आली. या ठिकाणी पात्र झोपडीधारकांचे यापूर्वीच पुनर्वसन करण्यात आले आहे. उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे व एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या या मोहिमेत दोन बुलडोझर, दोन जेसीबी, दोन इतर वाहने, ८० कामगार, ३० अभियंते, १५ पोलिस आदींची मदत घेण्यात आली. हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कैया शेट्टी मार्ग अतिक्रमणांमुळे ३ मीटर अरुंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेने एकावेळी एकच वाहन जात होते.

वळसा वाचला 

अनेक नागरिकांना गावदेवी, तुळशेतपाडा या ठिकाणी जाण्यासाठी दोन किलोमीटरचा फेरा पार करून जावे लागत होते. ही बाब लक्षात घेत महापालिकेने ही कारवाई हाती घेतली. आता रस्ता मोकळा झाल्याने दोन किमीऐवजी ५० मीटर अंतर पार करून इप्सितस्थळ गाठणे शक्य झाले आहे. ही ७५ बांधकामे तळमजला आणि त्यावर एक मजला अशा स्वरूपाची होती.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका