वकील असल्याचे भासवून ३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 05:25 IST2018-08-06T05:25:07+5:302018-08-06T05:25:15+5:30
मालमत्तेच्या वादातून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयात हरल्यानंतर, ५२ वर्षीय महिलेने वकिलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

वकील असल्याचे भासवून ३ लाखांची फसवणूक
मुंबई : मालमत्तेच्या वादातून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयात हरल्यानंतर, ५२ वर्षीय महिलेने वकिलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. खटला सुरू असतानाच वकील असल्याचे भासवून त्याने फीच्या नावाखाली ३ लाख रुपये उकळले. मात्र, प्रत्यक्षात तो सुनावणीसाठी हजरच राहिला नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.
कुलाबा परिसरात ५२ वर्षीय सोनम छेतलानी राहण्यास आहे. त्यांचा मालमत्तेवरून उच्च न्यायालयात खटला सुरू होता. २०१३ मध्ये वकिलांच्या शोधात असताना, त्यांची ओळख नीलेश मेहतांसोबत झाली. छेतलानी यांनी केलेल्या आरोपानुसार, मेहताने २०१३ मध्ये वकील नसताना, वकील असल्याचे भासवले आणि फीच्या नावाखाली ३ लाख रुपये उकळले.
हा खटला हरल्यानंतर महिलेने मेहताविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी मेहताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी २ आॅगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीची शहानिशा पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी अद्याप कुणालाही
अटक केली नसल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली. त्यांनी सादर केलेले पुरावे, तक्रारीचे गांभीर्य, तसेच कागदोपत्री असलेले वकिलांचे नाव आदींबाबत
अधिक तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.