Join us  

नवजात बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक; आदित्य ठाकरेंनी उपचारांसाठी केली 'लाख'मोलाची मदत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:47 PM

नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला.

ठळक मुद्देसात दिवसांच्या बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आले. तसेच ह्रदयात एक छेदही आढळून आला. बाळाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले असून याठिकाणी उपचार सुरू आहेत.

मुंबई : नवी मुंबईत जन्मलेल्या सात दिवसांच्या बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक आढळून आले. त्यामुळे या बाळाचे कुटुंबीय अस्वस्थ होते. मात्र, याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना समजली असता त्यांनी तातडीने 1 लाखांची मदत पुरविली आहे. तसेच, या बाळाचा वैद्यकीय खर्च सुद्धा करण्याची तयारी आदित्य ठाकरे यांनी दर्शविली आहे.

नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचा जन्म झाला. बाळाच्या आगमनामुळे कुटुंबीय आनंदी होते. मात्र, नंतर या नवजात बाळाला ह्रदयाशी संबंधीत आजार असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एरोली येथील महापालिकेच्या रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाचा जन्म होताच त्याचा जीव धोक्यात सापडला होता.

या सात दिवसांच्या बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आले. तसेच ह्रदयात एक छेदही आढळून आला. त्यानंतर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी या बाळाला नेरुळ येथील मंगल प्रभु रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर बाळाला तातडीने या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, बाळाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे बाळाचे वडील अब्दुल अन्सारी यांनी आपल्या बाळाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले असून याठिकाणी या बाळावर उपचार सुरू आहेत.

या काळात बाळाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती अन्सारी कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. अन्सारी कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत बेताची अशी होती. या बाळाच्या वडिलाने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ हा मन हेलावून टाकणारा होता. यामध्ये 'मी 10 ते 12 हजार रुपये कमवणारा माणूस आहे, आठ दिवस झाले अजून बाळाची प्रकृती नाजूक आहे. माझ्याकडे पैसे नाही, मी काही करू शकत नाही', असे म्हणत अब्दुल अन्सारी यांना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक शिवसैनिक हुसैन शाह यांना समजली. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीबद्दलची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आली. बाळाची माहिती समजताच आदित्य ठाकरे यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. आदित्य ठाकरे यांनी अन्सारी कुटुंबाला तातडीने 1 लाखांची मदत पुरविली आणि बाळाच्या उपचाराचा पुढील खर्च ही उचलणार असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मदतीमुळे अन्सारी कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आणखी बातम्या...

CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा...

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल” 

टॅग्स :आदित्य ठाकरेनवी मुंबईहॉस्पिटल