मुंबई - शहरात अडगळीत साचलेला कचरा, राडारोडा गोळा करण्यासाठी पालिकेने १५ जानेवारीपासून ‘कचरामुक्त तास’ मोहीम सुरू केली असून आठवडाभरात एकूण २९२.६ मेट्रिक टन कचरा गोळा केला आहे. या मोहिमेत तब्बल ८ हजार ६५४ लोकांनी सहभाग नोंदवल्याचेही स्पष्ट झाले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, तसेच खाऊ गल्ल्यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून वर्षभरापासून वॉर्डनिहाय स्वच्छता मोहीम राबवली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण २४ वॉर्डात आता कचरामुक्त तास ही विशेष मोहीम राबवली जात आहे. यात पहिल्या दिवशी एका दिवसात ६४ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर दरदिवशी ४० ते ५० मेट्रिक टन कचरा गोळा केला जात आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था, राष्ट्रीय सेवायोजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था यांना सहभागी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गोळा केलेल्या कचऱ्याची लागलीच विल्हेवाटही लावली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
गेल्या ६ दिवसांतील स्वच्छतातारीख गोळा केलेला कचरा१५ जानेवारी ६०.३ मेट्रिक टन १६ जानेवारी ४५.५ मेट्रिक टन १७ जानेवारी ४२.८ मेट्रिक टन २० जानेवारी ४९.२ मेट्रिक टन२१ जानेवारी ५१. ८ मेट्रिक टन २२ जानेवारी ४३ मेट्रिक टन
खाऊ गल्ल्यांमध्ये स्वच्छतेवर भर- या स्वच्छता मोहिमेत विशेष करून खाऊ गल्ल्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. परिसर स्वच्छ राखण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात येत आहेत.- या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला जात आहे. शिवाय यात ठिकठिकाणी असलेली बेवारस वाहने, सामान शोधून त्यावर कारवाई केली जात आहे.- पार्किंग केलेल्या वाहनांच्या खालील कचरा काढून भंगार साहित्य आणि सामग्रीची विल्हेवाट लावली जात आहे.