२७ गावांचा वाद आता पोलिसांत

By Admin | Updated: September 11, 2015 00:55 IST2015-09-11T00:55:19+5:302015-09-11T00:55:19+5:30

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक होईल, असे स्पष्ट केल्यानंतर संतप्त झालेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेनेला जबाबदार धरून सर्वत्र निषेधाचे होर्डिंग्ज लावले आहेत.

27 villagers dispute now in police | २७ गावांचा वाद आता पोलिसांत

२७ गावांचा वाद आता पोलिसांत

कल्याण : राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक होईल, असे स्पष्ट केल्यानंतर संतप्त झालेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेनेला जबाबदार धरून सर्वत्र निषेधाचे होर्डिंग्ज लावले आहेत. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. तिचे करावे काय? असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
गावे पुन्हा वगळण्याची अधिसूचना राज्य शासनाकडून जारी होताच संघर्ष समितीने गावागावांमध्ये जल्लोष साजरा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी परिपत्रक जारी करून २७ गावांना घेऊनच महापालिकेची निवडणूक होईल, असे स्पष्ट केले. याला संघर्ष समितीने शिवसेनेला जबाबदार धरले आहे. एवढेच नव्हे तर ‘शिवसेनेने केला आमचा विश्वासघात, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना शिवसेनेमुळे गेला तडा’अशा आशयाचे निषेध फलक जागोजागी लावले आहेत. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून भावना भडकाविणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अशी मागणी त्यांनी सहायक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी आणि मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांच्याकडे केली आहे. गावे वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यावर राज्य निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय दिला आहे. यात शिवसेनेचा काय संबंध, तरीदेखील शिवसेनेचा संबंध जोडून संघर्ष समिती कायदा सुव्यवस्था भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप शिवसेनेचे ग्रामीण नेते प्रकाश म्हात्रे यांनी केला आहे. तर, संघर्ष समितीचा लढा हा शांततेच्या मार्गाने सुरू असून कोणाच्याही भावना भडकाविण्याचा प्रश्न नसून निषेधाचे फलक हे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 27 villagers dispute now in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.