Join us

26/11 Terror Attack : २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा संजय निरुपमांना पडला विसर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:56 IST

२६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भला मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावलेल्या बॅनरमुळे सध्या चर्चा सुरु झाली आहे. ‘एनएसजी’चे (राष्ट्रीय सुरक्षा दल) कमांडो हवालदार गजेंद्र सिंग यांचा फोटो वगळण्यात आले आहे. त्यामुळे निरुपम यांना गजेंद्र सिंग या शहिद जवानाचा विसर पडल्याची चर्चा सुरु आहे.   एनएसजीचे एक पथक पोहोचले या पथकात गजेंद्र सिंग यांचा समावेश होता.

मुंबई -   मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लावलेल्या बॅनरमुळे सध्या चर्चा सुरु झाली आहे. २६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलीस आणि जवान मिळून १८ जणांना वीरमरण आले होते. मात्र संजय निरुपम यांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक भला मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी फक्त १७ जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. निरुपम यांच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर हे बॅनर लावण्यात आलेले आहे. यामध्ये ‘एनएसजी’चे (राष्ट्रीय सुरक्षा दल) कमांडो हवालदार गजेंद्र सिंग यांचा फोटो वगळण्यात आले आहे. त्यामुळे निरुपम यांना गजेंद्र सिंग या शहिद जवानाचा विसर पडल्याची चर्चा सुरु आहे.   

हवालदार गजेंद्र सिंग हे एनएसजीचे जवान होते. २६/११ ला  दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. कुलाबा परिसरातल्या नरिमन हाऊसवर (छाबड हाऊस) दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी एनएसजीचे एक पथक पोहोचले या पथकात गजेंद्र सिंग यांचा समावेश होता. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले पण तरीही त्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार चालूच ठेवला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना अशोक चक्र हे मानाचे पदक देऊन गौरविण्यात आले होते. गजेंद्र सिंग शहिद झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सिंग यांच्या पत्नी विनिता सिंग यांचा गौरव केला होता. 

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लामुंबईशहीद