२६/११च्या हल्ल्यातील मृतांना मुंबईकरांनी वाहिली आदरांजली!
By Admin | Updated: November 27, 2015 03:42 IST2015-11-27T03:42:04+5:302015-11-27T03:42:04+5:30
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त, राज्यासह मुंबई शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

२६/११च्या हल्ल्यातील मृतांना मुंबईकरांनी वाहिली आदरांजली!
मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त, राज्यासह मुंबई शहर-उपनगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हल्ल्यातील मृतांना आणि शहीद जवानांना मुंबईभर आदरांजली वाहण्यात आली.
मरिन लाइन्स पोलीस जिमखाना येथील स्मारकाला मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शहिदांच्या कुटुंबीयांसमवेत शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी पोलीस दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शहिदांच्या आठवणी कायम स्मृतीत राहाव्यात म्हणून जोगेश्वरीत स्थानिक आमदार राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शहिदांच्या स्मृतीस पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. प्रजासत्ताक भारत संघटनेने शहीद हेमंत करकरे, शहीद विजय साळसकर, शहीद अशोक कामटे, शहीद तुकाराम ओंबळे यांना कामा रुग्णालयाजवळ आदरांजली वाहिली.