आठ महिन्यात २६ सभा तहकूब
By Admin | Updated: July 13, 2015 23:08 IST2015-07-13T23:08:19+5:302015-07-13T23:08:19+5:30
आठ महिन्यातील मनपाच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी अजेंड्यावर बोलण्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यातच धन्यता मानली आहे.

आठ महिन्यात २६ सभा तहकूब
ठाणे : आठ महिन्यातील मनपाच्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी अजेंड्यावर बोलण्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यातच धन्यता मानली आहे. यामुळे ठाणेकरांचा पैसा आणि वेळही वाया गेला असून या कालावधीत तब्बल २६ सर्वसाधारण सभा तहकूब झाल्या आहेत.
महापालिकेच्या या सभा म्हणजे सर्वसाधारण सभेऐवजी गोंधळ सभाच ठरल्या आहेत. १० सप्टेंबरला संजय मोरे महापौरपदी विराजमान झाले. परंतु, शिवसेनेतील एका गटाला त्यांची निवड मान्य नसल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे अनेक वेळा सभागृहात दिसून आले आहे. त्यातही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याऐवजी अनेक वेळा सभागृहात हाणामाऱ्या, सचिवांची कॉलर पकडणे, त्यांच्यावर पाणी फेकणे यातच सदस्यांचा वेळ गेला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महासभेत याला कंटाळून आयुक्तांनीच थेट सदस्यांची ‘शाळा’ घेऊन अजेंड्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केवळ तीनच दिवसांनी आयुक्तांच्या या शाळेचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दाखवत सभा पुन्हा उधळवून लावली.
एकूणच तहकूब झालेल्या सभांपैकी काही सभा या श्रध्दांजली वाहण्यासाठी तर सर्व सभा या सभागृहातील गदारोळामुळेच तहकूब कराव्या लागल्या आहेत. काही महासभा खंडित करून तीनवेळा झाल्या तर कुठलीही चर्चा न करता सभागृहातील गदारोळात विषय मंजूर केल्याने विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली. महापौर मोरे यांच्या पहिल्या सभेत पोलिसांसह सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही विरोधकांनी आरोपांची राळ उडवून पालिका प्रशासनाची अंत्ययात्रा काढली होती. तेव्हाही विरोधकांनी थेट व्यासपीठावर जाऊन महिला सचिवांच्या हातातील विषय पत्रिकाच खेचली होती. त्यानंतर सचिव बदलले पण सभागृहातील वर्तन मात्र तसेच राहिले. कधी विषय पत्रिका खेचणे, कधी शिवीगाळ करणे, अंगावर पाणी फेकणे असे प्रकार सभागृहात घडत आहेत. विकासाच्या राजकारणापेक्षा सभागृहात शह-काटशहाचे राजकारण जास्त होत असल्याने शहराचा विकास मात्र खुंटला आहे. (प्रतिनिधी)