भाडेव्यवहारात ज्येष्ठ नागरिकाची २६ कोटींची फसवणूक
By Admin | Updated: January 22, 2015 01:50 IST2015-01-22T01:50:17+5:302015-01-22T01:50:17+5:30
एका ७२ वर्षांच्या जेष्ठ नागरिकाला एका कंपनीने २६ कोटी ५४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भाडेव्यवहारात ज्येष्ठ नागरिकाची २६ कोटींची फसवणूक
मुंबई : दक्षिण मुंबईत कार्यालयाच्या जागेचे भाडे देण्याऐवजी कंपनीच्या नफ्यात भागीदारी देण्याच्या आमिषाने एका ७२ वर्षांच्या जेष्ठ नागरिकाला एका कंपनीने २६ कोटी ५४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ४ परदेशी नागरिकासह ७ जणांविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुसूदन ठाकूर, सुभाष भट, निमेश देठिया, फिलोपो सर्नी, डग्लस जॉन हेन्डर्सन, डेव्हिड कोकर, क्रिस्टोफर लिंच अशी त्यांची नावे असून, रिगस साऊथ मुंबई बिजनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन करून फसवणूक केल्याचे दारा बाम्बोट पारसी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दारा बाम्बोट हे सोपारीवाला ग्रुप आॅफ कंपनीजमध्ये उपाध्यक्ष असून त्यांच्या कंपनीची फोर्ट येथे इस्माईल बिल्डिंगमध्ये तळमजला व पोटमाळ्यावर १९००० चौरस फुटाची जागा आहे. २०१० मध्ये रिगस साऊथ मुंबई बिझनेस सेंटरचे व्यवस्थापक मधुसूदन ठाकूर, लिंच व इतरांनी त्यांच्याशी संपर्क साधून कार्यालय सुरू करण्यासाठी जागेची मागणी केली. त्याच्या बदल्यात भाडे न देता कंपनीला होणाऱ्या नफ्यामधील ७५ टक्के हिस्सा देण्याचे मान्य केले. त्यानुसार करार करून कार्यालय चालवण्यासाठी बाम्बोट यांनी ८ कोटी रुपयांचे फर्निचर बनवून दिले. ७ जणांनी पहिल्यावर्षी केवळ ६१ लाख ५२ हजार, तर २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये दिले. कंपनीकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पूर्ण भरपाईची मागणी करून जागा सोडण्यास सांगितले, मात्र त्यांनी टाळाटाळ करून गेल्यावर्षी जागा सोडली. संगनमताने फसवणूक केल्याबाबत बाम्बोट यांनी न्यायालयात धाव घेतली.