लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतात घुसखोरी करून मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत तब्बल २५० बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून बॅंक खाते बंद करण्याची नोटीस
बांगलादेशी नागरिक मुंबईत विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करत आहेत. त्यातील अनेक जण येथे काम करून लखपती झाल्याचेही तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात.
अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर इतर बांगलादेशी नागरिकांनाही येथे स्थायिक करण्यासाठी बेकायदा काम करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्याविरोधात एटीएस, मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
संशयित बांगलादेशी नागरिकांचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवली जात आहे. याशिवाय रेशनकार्ड, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १४५ बांगलादेशींना पाठवण्यात आले असून, त्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्याखालोखाल पुरुष, लहान मुले आणि तृतीयपंथींचा समावेश आहे. शुक्रवारीही १५० हून अधिक जणांना परत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.