Join us

तेजस एक्स्प्रेसमध्ये 25 प्रवाशांना विषबाधा; आठवड्यातील दुसरा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:39 IST

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुरविलेल्या अन्न पदार्थांमुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजेच असताना आता कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्दे बुरशी आलेले सँडविच देण्यात आले होते. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना नाश्त्यामधून विषबाधा झाली होती.

मुंबई : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुरविलेल्या अन्न पदार्थांमुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजेच असताना आता कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करमाळीहून (गोवा) मुंबईला येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी उलट्या होत असल्याची तक्रार केली. यानंतर जवळपास 25 प्रवाशांची प्रकृती खराब झाली. या प्रकरणी कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला आहे. 

या प्रवाशांना जेवणामध्ये मिक्स भाजी देण्यात आली होती. हे जेवण जेवल्यानंतर या प्रवाशांना उलट्या होऊ लागल्या. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर ठेकेदाराकडून नीट उत्तर देण्यात आले नाही. यामुळे व्हिडीओद्वारे सोशल मिडीयावर तक्रार करण्यात आली. हा व्हीडिओ जेव्हा ट्विटरवर पोस्ट करण्यात आला तेव्हा रेल्वेला याची माहिती मिळाली. प्रशासनाकडून त्वरीत कारवाई करण्यात आली. याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर 1 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. 

तेजस एक्स्प्रेस चिपळूनला संध्याकाळी 6.18 वाजता आली असताना हे जेवण ट्रेनमध्ये नेण्यात आले होते. तेव्हा ते गरम होते. प्रवाशांना हे जेवण 8.30 च्या सुमारास देण्यात आले. यापैकी काही पाकिटांमधील जेवण खराब झाले. गरमागरम भाजी पॅकबंद केल्याने हा प्रकार झाला असण्याची शक्यता रेल्वेच्य़ा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

तर मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, या कंत्राटदारावर 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यामध्ये कंत्राट रद्द करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय कोचच्या निरिक्षकावरही कारवाई करण्यात येणार आहे.  

या आधी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना नाश्त्यामधून विषबाधा झाली होती. बुरशी आलेले सँडविच देण्यात आले होते. प्रवाशांची तब्येत खराब झाल्यानंतर प्रकार उघड झाला. एका ट्विटर युजरने बुरशी लागलेले फोटे शेअर केले होते. 

टॅग्स :तेजस एक्स्प्रेसअन्नातून विषबाधाचिपळुण