Join us  

२५ लाख ठाणेकरांना आठवडाभरात कोरोनाची लस; आधारकार्ड लिंक करण्याचा विचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 3:21 AM

ठाणे महानगरपालिकेचे नियोजन

ठाणे : नव्या वर्षात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेनेदेखील तयारी सुरू केली असून लस आल्यानंतर आठवडाभरात २५ लाख ठाणेकरांना देण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. ही लस देताना आधारकार्ड लिंक करून दिले जाऊ शकते का, याचे नियोजन करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. 

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आली, तरी तिचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज असताना, आता कोरोनाची लस आली तरी ती देण्याचे नियोजन कसे करणे गरजेचे आहे, त्या अनुषंगानेही पालिकेने सर्वात आधी पावले उचलली आहेत. भविष्यात लस आली, तर वेळेवर धावपळ होणार नाही, यादृष्टीने लस येण्याच्या आधीच ठाणे महापालिकेने तयारी पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या ही २५ ते २६ लाखांच्या जवळपास असून, संपूर्ण लोकसंख्येला आठवडाभरात लस देण्याचे नियोजन केल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.के. मुरूडकर यांनी दिली. 

लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवणे अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ त्यातूनच कोरोनाचे समूळ उच्चाटन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचा लढा जेवढ्या गांभीर्याने घेतला गेला, तेवढ्याच गांभीर्याने ही लसीकरणाची मोहीमही राबवण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

५० हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम विटावा ते डोंबिवलीच्या वेशीपर्यंत कोराेनाची लस देण्यासाठी सेंटर्स उपलब्ध असणार आहेत. यासाठी शहरातील सर्व महापालिकेचे आणि खाजगी हॉस्पिटल, सर्व आरोग्य केंद्रे, महापालिकेचे आणि खाजगी डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्स अशी एकूण ५० हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेतसाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.

 

टॅग्स :ठाणे महानगरपालिका