जिल्ह्यात पर्यटनासाठी २४३ कोटी

By Admin | Updated: February 7, 2015 22:48 IST2015-02-07T22:48:59+5:302015-02-07T22:48:59+5:30

निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि प्राचीन, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा रायगड जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो.

243 crores for tourism in the district | जिल्ह्यात पर्यटनासाठी २४३ कोटी

जिल्ह्यात पर्यटनासाठी २४३ कोटी

जयंत धुळप - अलिबाग
निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि प्राचीन, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा रायगड जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला ऐतिहासिक रायगड किल्ला, कुलाबा तसेच मुरूड-जंजिरासारखे जलदुर्ग, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची समाधी, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे घारापुरी अशी तब्बल ८७ पर्यटनस्थळे व ऐतिहासिक किल्ले रायगड जिल्ह्यात आहेत.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्याचा या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या विकासाकरिता बृहत् आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरिता २४३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनस्थळ विकासाच्या योजनांमध्ये दिवेआगर व हरिहरेश्वर येथील मंदिर परिसर सुधारणा, पायाभूत सुविधा व रस्त्यांची विविध कामे तसेच श्रीवर्धन येथील भुवनाळे तलावाचे सुशोभिकरण, माथेरान येथील विविध रस्त्यांची कामे, अलिबाग तीनवीरा येथील धरणाजवळ पर्यटनस्थळ विकासाचे काम, घारापुरी येथील धरणाच्या ठिकाणी खालच्या बाजूस असलेल्या जागेत उद्यान विकसीत करणे, खालापूर तालुक्यातील बोरघाट दस्तुरी येथील पर्यटनस्थळ विकासाचे काम, कर्जत तालुक्यातील मांडवणे येथील पर्यटनस्थळ विकास, भिवपुरी येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या तलावाचे सुशोभिकरण करणे या कामांचा समावेश असल्याचे भांगे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, सागरी किनारे व ऐतिहासिक किल्ल्याचा सुनियोजित विकास आराखडा तयार करून त्याची त्या त्या ठिकाणाच्या गरजेनुसार आणि स्थानिकांना व्यवसायसंधी उपलब्ध करून देण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून विकास योजनेची अंमलबजावणी केल्यास गोव्याप्रमाणे मोठी आर्थिक प्राप्ती पर्यटन व्यवसायातून होऊ शकते, असा विश्वास गडभ्रमंतीकार व निसर्गप्रेमी छायाचित्रकार शेखर राजेशिर्के यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील गिरीमंडळे, ऐतिहासिक किल्ल्याच्या जवळची युवा मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून समन्वय साधल्यास या युवा फौजेचे मोठे योगदान या ऐतिहासिक वास्तू व किल्ल्यांच्या पर्यटन विकासाच्या प्रक्रियेत मिळू शकते. एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटन मोहिमा देखील रायगड जिल्ह्यात आयोजित करता येऊ शकतील. गेल्या काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची योजना होती परंतु ती थंडावली आहे, तिचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असल्याची अपेक्षा देखील राजेशिर्के यांनी व्यक्त केली आहे.

श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यवरील विकासाचे काम पूर्ण झाले आहे तर मुरुड, माथेरान तसेच हरिहरेश्वर-मारळ येथे पाणीपुरवठा योजनांचे काम सुरु आहे. अष्टविनायक क्षेत्रापैकी रायगड जिल्हयातील सुधागड-पाली व महड येथील विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

Web Title: 243 crores for tourism in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.