Join us
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शाळांचे आरटीईचे २४०० कोटी शासनाने थकवले; मेस्टाचे ९वे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2024 18:10 IST

राज्यभरातुन येणाऱ्या इंग्रजी शाळा संस्थाचालकामधून ११ उत्कृष्ट ट्रस्टी पुरस्कार , २२ उत्कृष्ट स्कुल पुरस्कार , १८ उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार , ४४ शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

-श्रीकांत जाधव

मुंबई : शासनाकडून देय असलेला आरटीई फी चा पूर्ण परतावा अद्याप शाळांना आलेला नाही. राज्यातील २० हजार खाजगी शाळांचे २४०० कोटी शासनाने रखडवले आहेत. आरटीई कायद्याखाली खाजगी शाळांची फसवणूक सुरू असल्याचे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजय तायडे पाटील यांनी येथे सांगितले.

मेस्टाचे ९ वे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत संपन्न होत आहे. त्याबाबत मंगळवारी प्रेस क्लब येथे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजय तायडे पाटील, नरेश पवार, सुदर्शन त्रिगुणीत यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन " मेस्टा " या राज्यव्यापी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन व सांस्कृतिक महोत्सव यावर्षी मुंबईत १८ व १९ जानेवारीला भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे होत आहे. राज्यातील दोन हजार संस्थाचालक या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी शासनाकडे आरटिई २५ टक्के राखीव आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थांसाठी शालेय साहीत्य, पुस्तके व गणवेश मोफत मिळावे, मार्च अखेर पर्यंत २५ टक्के राखीव आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची थकीत आरटीई प्रतिपुर्ती रक्कम मिळावी, शाळांसाठी संरक्षण कायदा, जबरदस्तीने वसुल करण्यात येणारा मालमत्ता कर व व्यवसायीक दराने घेण्यात येणारे विजबील माफी आदी मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. राज्यभरातुन येणाऱ्या इंग्रजी शाळा संस्थाचालकामधून ११ उत्कृष्ट ट्रस्टी पुरस्कार , २२ उत्कृष्ट स्कुल पुरस्कार , १८ उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार , ४४ शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :माहिती अधिकार कार्यकर्ताशाळा