Join us  

उन्हाळी सुट्ट्यांत दर आठवड्यात विमान कंपन्यांच्या २४ हजार फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:15 AM

गेल्या वर्षी या कालावधीमध्ये २३ हजार ७३२ विमान फेऱ्या विमान कंपन्यांनी केल्या होत्या. यंदा आझमगड, अलिगढ व चित्रकूट या अलीकडे कार्यान्वित झालेल्या विमानतळांवरही वाढीव विमान फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. 

मुंबई : आगामी काळात असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या व विमान प्रवाशांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपासून भारतीय विमान कंपन्या प्रत्येक आठवड्याला एकूण २४ हजार २७५ फेऱ्या करणार आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विमान फेऱ्यांची संख्या ६ टक्के इतकी अधिक आहे. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये २३ हजार ७३२ विमान फेऱ्या विमान कंपन्यांनी केल्या होत्या. यंदा आझमगड, अलिगढ व चित्रकूट या अलीकडे कार्यान्वित झालेल्या विमानतळांवरही वाढीव विमान फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार, देशात गेल्या दहा वर्षांत ७० पेक्षा नवीन विमानतळे कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी या अधिक फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मुंबई विमानतळावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिरिक्त आठ टक्के फेऱ्या होणार आहेत. 

उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक ३१ मार्च ते २६ ऑक्टोबर या कालावधीकरिता लागू आहे. या कालावधीत आठवड्याला मुंबईतून एकूण ६,६५७ फेऱ्या होतील. यापैकी, आंतरराष्ट्रीय मार्गांवर पॅरिस, दोहा, हनोई आणि ताश्कंद येथे अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. तर, देशांतर्गत मार्गांवर दिल्लीसाठी अतिरिक्त २८ फेऱ्या होणार आहेत. तसेच, श्रीनगरसाठी २८, अयोध्येसाठी १४ आणि कोलकातासाठी ९ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. मुंबई विमानतळावर दिवसाकाठी ९५१ विमान फेऱ्या होतात.

टॅग्स :विमान