२४ लाखांच्या चोरी: संशयाची सुई कामगारांकडे
By Admin | Updated: August 17, 2014 23:54 IST2014-08-14T22:25:47+5:302014-08-17T23:54:37+5:30
मुलुंडच्या वैशालीनगर परिसरातील सराफाच्या दुकानात झालेल्या २४ लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी दुकानातील चार कामगारांवर संशयाची सुई आहे

२४ लाखांच्या चोरी: संशयाची सुई कामगारांकडे
मुलुंड: मुलुंडच्या वैशालीनगर परिसरातील सराफाच्या दुकानात झालेल्या २४ लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी दुकानातील चार कामगारांवर संशयाची सुई आहे. या कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. दुकानातील चारही कामगार चोरी झाली त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुकानात झोपले असल्याने पोलिसांचा या कामगारांवरील संशय बळावला आहे.
कल्पनगरी इमारतीत कुटुंबासह राहणारे सोनेव्यापारी नेपाल घोष (५७) यांचे इमारतीच्या तळ मजल्यावर तीन गाळ्यांमध्ये दागिन्यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेल्यानंतर शटर आणि ग्रीलचे लॉक तोडून दुकानातील १० लाखांचे ११५ ग्रॅम सोने, १४ लाखांचे हिर्याचे दागिने आणि पाच हजार रोख असा तब्बल २४ लाखांचा ऐवज लुटून नेला. घोष यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुलुंड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
चारही कामगार दुकान बंद करुन दुकानात झोपत असल्याने घोष सीसीटीव्ही कॅमेर बंद ठेवत होते. चोरी झाली त्या रात्रीसुद्धा चारही कामगार रात्री पावणेदोनच्या सुमारास झोपले. त्यानंतर घुसलेल्या लुटारुने शटर आणि ग्रीलचे लॉक तोडून आत प्रवेश केला. लॉक तोडल्याचा कोणताही आवाज आला नसल्याचे नोकरांचे म्हणणे आहे. चारही कामगारांना ओलांडून जाऊनही तिजोरी आणि कपाटातील दागिने लुटल्यानंतरही कामगारांना जाग आली नाही. एका कामगाराने मात्र रात्री तीन आणि पहाटे पाच वाजता जाग आल्याचे पोलीस तपासात कबूल केेले आहे. या कामगारांची आता कसून चौकशी सुरु आहे. असल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत.