मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतरची २२ वर्षे
By Admin | Updated: July 15, 2015 23:08 IST2015-07-15T23:08:22+5:302015-07-15T23:08:22+5:30
अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीतील हिंसाचाराचा सूड घेण्यासाठी माफिया डॉन दाऊद इब्राहिम याने आयएसआय या पाक हेर

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतरची २२ वर्षे
मुंबई : अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीतील हिंसाचाराचा सूड घेण्यासाठी माफिया डॉन दाऊद इब्राहिम याने आयएसआय या पाक हेर संघटनेच्या मदतीने दोन महिन्यांतच मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या घटनेला तब्बल २२ वर्षे उलटल्यानंतर या खटल्यातील पहिल्या आरोपीला फाशीची सजा होणार आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या देशातील पहिल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या खटल्याचा तपशील.....
१२ मार्च १९९३
मुंबईत १३ ठिकाणी शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोट. २५७ जण ठार तर ७१३ जण जखमी
१४ मार्च १९९३
वरळी येथील सिमेन्स कंपनीजवळ बेवारस अवस्थेत सापडलेल्या मारुती ओमनी कारने मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासाला दिशा दिली. ही कार टायगर मेमनची वहिनी रुबिना हिच्या नावे होती. आरटीओ कार्यालयातून रुबिनाच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीतील घरी पोलीस पोहोचले. याच इमारतीत टायगरचे २ तर याकूबचे ६ फ्लॅट होते. प्रत्येक घरातून पोलिसांना बॉम्बस्फोटांशी संबंधित भक्कम पुरावे हाती लागले. दुसऱ्याच दिवशी मुंबई पोलिसांनी या स्फोटांमागे डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि त्याचे कुटुंबीय आहेत हे स्पष्ट केले. मात्र स्फोटांआधीच मेमन कुटुंबीय देशाबाहेर पसार झाले होते.
एप्रिल १९९४
याकूबला दिल्लीत अटक करण्यात आली. सूत्रांनुसार मात्र भारतीय सुरक्षायंत्रणांनी त्याला नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू विमानतळावरून ताब्यात घेतले. मेमन कुटुंबात याकूब उच्चशिक्षित होता. तो व्यवसायाने चार्टड अकाउंटंट होता.
जुलै १९९९
याकूबने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून खटल्यातून सूट मिळावी अशी मागणी केली. स्वत:हून भारतात परतल्याचा दावाही त्याने या पत्राद्वारे केला.
सप्टेंबर २००१
वडील अब्दुल रझाक मेमन यांच्या निधनानंतर याकूबला कारागृहाबाहेर पडण्याची संधी मिळाली. ती पहिली व अखेरची संधी ठरली.
२७ जुलै २००७
विशेष टाडा न्यायाधीश न्या. प्रमोद कोदे यांनी याकूब मेमनला फाशीची शिक्षा ठोठावली.
जुलै २००९
कारागृहातच कुटुंबासोबत काही क्षण घालविण्यासाठी याकूबने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.
२१ मार्च २०१३
सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले आणि याकूबला झालेली फाशीची शिक्षा कायम केली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने याकूब हा १९९३ मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मास्टरमार्इंड असल्याचे निरीक्षण नोंदविले. याच वर्षी याकूबने दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
आॅक्टोबर २०१३
याकूबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला.
मे २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूबचा दयेचा अर्ज फेटाळला.
२ जून २०१४
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. जे.एस. खेहर आणि न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली. तसेच महाराष्ट्र सरकारला नोटीस धाडली.
डिसेंबर २०१४
याकूबने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस धाडून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.
१० एप्रिल २०१५
सर्वोच्च न्यायालयाने याकूबने केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली.
३० जुलै २०१५
सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पीटिशन फेटाळल्यास याकूबला नागपूर कारागृहात फासावर लटकावण्यात येईल. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यास या खटल्यात फासावर लटकणारा याकूब पहिला आरोपी ठरेल.