एकाच दिवसात २२ हजार हरकती दाखल
By Admin | Updated: April 19, 2015 00:27 IST2015-04-19T00:27:14+5:302015-04-19T00:27:14+5:30
भूमिपुत्र, कष्टकरी समाज, झोपडपट्टीवासीयांच्या अस्तित्वावरच विकास आराखडा २०३४ यामधून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़

एकाच दिवसात २२ हजार हरकती दाखल
मुंबई : भूमिपुत्र, कष्टकरी समाज, झोपडपट्टीवासीयांच्या अस्तित्वावरच विकास आराखडा २०३४ यामधून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे या संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने महापालिकेवर आज मोर्चा आणला़ सकाळपासून मुख्यालयाबाहेर रांगा लावून एका दिवसात तब्बल २२ हजार हरकती व सूचना दाखल करीत या आंदोलकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला़ वाढत्या दबावामुळे सूचना व हरकतींची मुदत वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे़
सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांकरिता शहराचे नियोजन करणारा आराखडा तयार करण्यात आला आहे़ परंतु या आराखड्यातील असंख्य त्रुटींमुळे धार्मिक स्थळं, पुरातन वास्तू, कोळीवाडे, गावठाण, पुरातन चर्च, झोपडपट्ट्या, फेरीवाले अशी सर्वच ठिकाणं व श्रमिक कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ त्यामुळे आपल्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आज आझाद मैदानावर धडकले़ हमारा शहर, हमारा विकास, हमारा नियोजन अभियानांतर्गत हे मुंबईकर आज एकत्रित आले होते़
आपल्या हक्कासाठी एकाच दिवसांत सूचना व हरकतींचा पाऊस पाडून पालिकेला जेरीस आणण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला होता़ त्यानुसार सकाळपासूनच मुख्यालयाच्या ७ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराबाहेर नागरिकांच्या रांगा लागू लागल्या़ त्यामुळे तणाव वाढल्याने अखेर प्रवेशद्वाराच्या दरवाजातच पालिकेने चार बाकडे टाकून लोकांच्या तक्रारी घेण्यास सुरुवात केली़ संध्याकाळी साडेपाचपर्यंत १५ हजार हरकती व सूचना दाखल केल्याचा दावा युवाचे कार्यकर्ते अरविंद उन्नी यांनी केला़ (प्रतिनिधी)
२५ फेब्रुवारीपासून ९० दिवसांमध्ये सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे़ त्यानुसार विकास आराखड्यावर आतापर्यंत १० हजारांहून अधिक सूचना पालिकेकडे आल्या आहेत़ यामध्ये आज २२ हजार सूचनांची भर पडली़ मुदत न वाढविल्यास आणखी ५० हजार सूचना व हरकती दाखल करण्यात येतील, असा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला़
मुदतीत वाढ होण्याची शक्यता
च्या आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकारी आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन २४ एप्रिलपर्यंतची मुदत वाढविण्याची मागणी केली़
च्परंतु सुचना व हरकतींची मुदत वाढविणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याचे कुंटे यांनी सांगितले़ परंतु मुदतवाढीचा प्रस्ताव पालिकेकडून याआधीच शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यानुसार मुदतवाढ मिळण्याची शक्यता पालिकेतील सुत्रांनी व्यक्त केली़
जुहू, वर्सोवा, गोवंडी, मालाड, मालवणी येथील गावठाण व कोळीवाडे तसेच मालाड, मालवणी, गोरेगाव, जोगेश्वरी, शिवाजी नगर, गोवंडी, मानखुर्द, मंडला, वडाळा, सायन येथील झोपडपट्टीतील रहिवासी मोठ्या संख्येने मुख्यालयाबाहेर आज रांगा लावून उभे होते़
यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती़ त्यामुळे तणाव वाढू लागल्याने पालिकेने मुख्यालयाचे द्वार बंद करून प्रवेशद्वाराबाहेरच या नागरिकांच्या सूचना व हरकती घेण्याची व्यवस्था केली़