Join us  

तलावांमध्ये २२ टक्के साठा; पालिका म्हणते ‘नो टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 5:20 AM

जुलैपर्यंतचे नियोजन; कपातीची आवश्यकता नसल्याची मुख्य अभियंत्यांची माहिती

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याबरोबर तलावांमधील जलसाठाही कमी होत चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजचा जलसाठा केवळ २२ टक्केच आहे, तरीही जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या वर्षी जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्के कमी असला, तरी राखून ठेवलेल्या साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी माहिती मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडीया यांनी शुक्रवारी स्थायी समितीत दिली.

दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर पाणी असल्यास वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होतो. या वर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे तलावांमध्ये दोन लाख दशलक्ष लीटर जलसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे १५ नोव्हेंबरपासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे, तर डिसेंबरपासून मुंबईतील विविध विभागातून अपुऱ्या पाणीपुरवठ्याची तक्रार होऊ लागली. पालिका प्रशासनाने पाणीकपातीमध्ये छुपी वाढ करण्यात आल्याचाही आरोप नगरसेवकांनी केला. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक बिघाड होत असल्याने, ही समस्या निर्माण होत असल्याची सारवासारव अधिकारी करीत होते.

राखीव कोट्याचा करणार वापरमुंबईला सात धरणांमधून दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा आता जेमतेम दीड महिना उरला असून, तलावांमध्ये २२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मात्र, पालिकेने राज्य सरकारडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोट्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार, जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पुरेसा पाणीपुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, तोपर्यंत मान्सूनलाही सुरुवात होईल. त्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ करण्याची गरज नाही, असे प्रशासनाने स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले.

टॅग्स :पाणी