लाच प्रकरणी १५ सापळ्यांत २२ जण जेरबंद
By Admin | Updated: February 8, 2015 22:48 IST2015-02-08T22:48:26+5:302015-02-08T22:48:26+5:30
जानेवारी महिन्यात ठाणे लाचलुचपत विभागाने लावलेल्या १५ सापळ्यांत २२ जणांना जेरबंद केले. त्यात तीन इसमांसह एका महिला तलाठ्याचा यामध्ये समावेश आहे.

लाच प्रकरणी १५ सापळ्यांत २२ जण जेरबंद
ठाणे - जानेवारी महिन्यात ठाणे लाचलुचपत विभागाने लावलेल्या १५ सापळ्यांत २२ जणांना जेरबंद केले. त्यात तीन इसमांसह एका महिला तलाठ्याचा यामध्ये समावेश आहे.
गतवर्षाच्या तुलनेत यंदा अटक केलेल्या लाचखोरांची संख्या ८ ने वाढली आहे. २०१४ च्या जानेवारी महिन्यात १४ लोकसेवकांसह खाजगी लोकांना लाच घेताना आणि देताना अटक झाली होती.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे जिल्हा-शहर, पालघर जिल्हा, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील वर्षी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारींवरून शासकीय ३९ विभागांतील ८० सरकारी बाबूंसह लाचखोरांना जेरबंद केले.
२०१४ प्रमाणे २०१५ मध्ये पहिल्या दिवशी सिंधुदुर्गमध्ये कारवाई करण्यात आली. या वेळी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याला पकडण्यात आले. अशा प्रकारे जानेवारी २०१५ मध्ये एकूण १५ सापळे लावून २२ जणांना अटक केली आहे. या केलेल्या कारवाईत सर्वाधिक ४ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला पकडले. सर्वात कमी म्हणजे एक हजार घेताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकास अटक झाली आहे. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील लाचखोरांना या महिन्यात पकडले आहेत. ही कारवाई अशीच सुरु रहावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होते आहे. (प्रतिनिधी)