मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंड येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यातून ऊर्जा) प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने २७० दिवसांची (जवळपास नऊ महिने) मुदतवाढ दिली आहे. हा प्रकल्प मूळ नियोजनानुसार, ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार होता. मात्र, प्रकल्पासाठी आवश्यक सरकारी व कायदेशीर मंजुऱ्यांना विलंब झाल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील नऊ एकर जागेवर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यावर या प्रकल्पातून वीजनिर्मिती करता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये या प्रकल्पासाठी विंडो कम्पोस्टिंग आणि भस्मीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स चेन्नई एमएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पातून दररोज आठ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.१७ दशलक्ष युनिटपैकी ४२ दशलक्ष युनिट ऑपरेटरला, तर ५८ दशलक्ष युनिट पालिकेला वापरता येणार आहे.
६,५०० मे.टन कचरा कचऱ्याच्या समस्येपासून मुक्तता मिळावी, यासाठी काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार पालिकेने २०२० मध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारे विविध उपक्रम राबविले. इमारतींमधील कचऱ्याच्या निर्मितीत घट होऊन प्रतिदिन ६,५०० मेट्रिक टन इतके झाले आहे. पालिकेने नवीन इमारती आणि संकुलांना परिसरातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता प्रकल्प सुरू करण्याची सक्ती केली आहे.