Join us  

२०१० नंतर यंदाच्या नोव्हेंबरमध्ये कोसळला सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 7:20 AM

स्कायमेटची माहिती; चेंबूरमध्ये झाड कोसळून तीन जखमी

मुंबई : ‘क्यार’, ‘महा’ आणि ‘बुलबुल’ अशी एकावर एक चक्रीवादळे येत असतानाच हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे यंदा आॅक्टोबरसह नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबर २०१९च्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे ४६ मिमी पावसाची नोंद झाली असून, २०१० नंतरचा हा जास्त पाऊस असलेला यंदाचा नोव्हेंबर महिना आहे.

आॅक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस कोसळत नाही. क्वचित हलक्या सरी कोसळतात. मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे ४६ मिमी पावसाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सरासरी ९.९ मिमी पाऊस कोसळतो. मात्र शहरात यापूर्वीच ४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०१० नंतरचा जास्त पाऊस असलेला नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये मुंबईत ४७.२ मिमी पाऊस कोसळला होता. दरम्यान, आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने २०१० सालचा विक्रम मोडला जाऊ शकतो.

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी पावसाने जोर धरला असतानाच चेंबूर येथील पेस्तम सागर रोडवर गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. विकास पडिताळत, महेश पतरकय आणि शिवाजी लोंढे अशी जखमींचे नावे आहेत. विकास दहा वर्षांचा असून, महेश सात वर्षांचा आहे. तर लोंढे पन्नास वर्षांचे आहेत. दुर्घटनेतील तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत आकाश मोकळे होते. दुपारी रखरखीत उन पडले होते. क्वचित कुठे तरी एखाद दुसरा ढग काळोख घेऊन पुढे जात होता. मात्र सायंकाळनंतर मुंबई शहरासह उपनगरातील हवामानात बदल नोंदविण्यात येऊ लागले. मुंबई शहरात म्हणजे दक्षिण मुंबईत सायंकाळी सहा वाजल्यानंतर पाऊस घेऊन आलेल्या ढगांनी गर्दी केली. आणि क्षणार्धात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. वरळी येथे सरी कोसळत असतानाच पश्चिम उपनगरातल्या हवामानातही बदल नोंदविण्यात येऊ लागला. मालाड, बोरीवली आणि गोरेगावसह लगतच्या परिसरात कोसळत असलेल्या सरींचे प्रमाण मोठे होते, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. सकाळ आणि दुपार कोरडी असतानाच सायंकाळी पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची किंचित धावपळ उडाली. सायंकाळी किंचित क्षणी कोसळलेल्या अवकाळी पावसाने रात्री सात साडेसात नंतर मात्र विश्रांती घेतली.थंडीच्या दिवसांतही सरींवर सरीगुरुवारी दुपारी रखरखीत उन पडले असतानाच सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, दुपारी उन आणि रात्री पाऊस अशा दुहेरी वातावरणास मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी मुंबईकरांना ‘ताप’ दायक ठरणारा आॅक्टोबर हिट यावर्षी जाणवले नाही. आॅक्टोबर महिन्यातही पावसाने सलगता कायम ठेवल्याने दिवाळीदेखील मुंबईकरांनी पावसाळ्यात साजरी केली. याहून महत्त्वाचे म्हणजे ऐन थंडीच्या दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात सरींवर सरी कोसळत असून, हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. 

टॅग्स :मुंबईचक्रीवादळपाऊस