2006 Mumbai Train Blasts:मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबईउच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने त्यांचा अपील मान्य केला. फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे.
१२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. तर ११ जणांचा आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली आहे. गेली १९ वर्ष यातील दोषी एकही दिवस तुरुंगाबाहेर आले नव्हते.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. "दोषींविरोधात केवळ शंकेपलिकडे कोणतेही सबळ पुरावे तपास यंत्रणा सादर करू शकली नाही", असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे.
न्यायालयाला जवळजवळ सर्वच सरकारी वकिलांचे जबाब अपूर्ण वाटले. न्यायालयाच्या मते, स्फोटाच्या जवळजवळ १०० दिवसांनंतर टॅक्सी चालकांना किंवा ट्रेनमधील लोकांना आरोपींची आठवण येण्याचं कोणतंही कारण नव्हतं. याशिवाय, बॉम्ब, बंदुका, नकाशे इत्यादी पुरावे जप्त करण्याबाबत न्यायालयानं म्हटलं की, ही जप्ती खटल्यासाठी महत्त्वाची ठरत नाही कारण स्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बचा प्रकार ओळखण्यात सरकारी वकिलांना अपयश आलं आहे.
कुणाकुणाची झाली निर्दोष मुक्तता?कमाल अन्सारी, मोहम्मद फैसल, अतौर रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नवीद हुसेन खान आणि आसिफ खान या सर्वांना बॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचही जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील कमाल अन्सारीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरित चार जण निर्दोष ठरवण्यात आले आहेत.
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये तनवीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहमान शेख यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.
मुंबईच्या इतिहासातील काळा दिवसमुंबईत ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मीरारोड या रेल्वे स्थानकांदरम्यान स्फोट झाले होते. यात २०९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मुंबई लोकलमध्ये संध्याकाळच्या वेळी गर्दी असते. त्यामुळे जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा उद्देशानंच हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. तपासानंतर हे स्फोट लष्कर-ए-तैयबा Lashkar-e-Taiba (LeT) आणि सिमी Students Islamic Movement of India (SIMI) या दहशतवादी संघटनांनी घडवले, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.