Join us  

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात, तलावांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 9:21 PM

५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून बचत करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई - मान्सूनचे दोन महिने संपूनही तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा जमा आहे. आतापर्यंत केवळ तुळशी तलाव भरले असून अन्य सर्व मोठ्या तलावांमध्ये ५० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले असल्याने ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून बचत करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

सन २०१८, २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी अनुक्रमे ८५.६८ टक्‍के व ८३.३० टक्‍के एवढा जलसाठा जमा झाला होता. मात्र यावर्षी जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कमी राहिला. त्यामुळे दोन पावसाळी महिन्यानंतरही सर्व सात तलावांमध्ये एकूण चार लाख ९९ हजार दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. या जलसाठ्यातून केवळ डिसेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांची तहान भागणार आहे. त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतर महापालिकेकडे पुरेसा जलसाठा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे पाणीपुरवठा सुरू ठेवण्‍यासाठी २० टक्‍के पाणीकपात करण्‍यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शनिवारी बकरी ईद आणि सोमवारी रक्षा बंधन हे दोन मोठे सण असल्याने ५ ऑगस्टपासून पाणी कपात लागू होणार आहे.

भिवंडी, अन्य गावांमध्येही पाणीकपात...

मुंबईप्रमाणेच तलाव क्षेत्रातील ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना मुंबई महापालिकेमार्फत होणाऱ्या पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी ९०० दशलक्ष लिटर पाणी दररोज गळती आणि चोरीमुळे वाया जाते. १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असल्यास मुंबईत वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा होतो. तलाव क्षेत्रात आवश्यक जलसाठा जमा न झाल्याने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करावी लागली होती. मात्र २०१९ मध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर गतवर्षी जुलै महिन्यात पाणीकपात रद्द करण्यात आली. तसेच यापूर्वी २०१०, २०१४ मध्ये मुंबईत पाणी संकट ओढावले होते. 

जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )

तलाव    कमाल         किमान      उपायुक्त साठा (दशलक्ष)  सध्या

मोडक सागर १६३.१५   १४३. २६       ५१८६६   ....१५२.८१

तानसा    १२८.६३        ११८.८७        ३७२८३     ...१२२.००

विहार    ८०.१२        ७३.९२        १९०२६.....७८.४५

तुळशी    १३९.१७        १३१.०७       ८०४६    ..१३९.२६

अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९७.०२    ३९३७५.....५९७.०८

भातसा    १४२.०७        १०४.९०        २७७३५१     ...१२३.००

मध्य वैतरणा २८५.००    २२०.००        ६६२५२....२५९.८३

 

३१ जुलै रोजी तलावांमध्ये जलसाठा

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष मिटर)...टक्के

२०२० -  ४९९१९९...३४.४९ 

२०१९ - १२४०१२२....८५.६८

२०१८- १२०५५९६...८३.३०

टॅग्स :पाणी