लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत ‘म्हाडा’ने केलेल्या सर्वेक्षणात सध्या ९६ अतिधोकादायक इमारती आढळल्या आहेत. येथील भाडेकरूंना स्थलांतरित करण्यासाठी शासनाने संक्रमण शिबिरासारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, जे भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नाहीत त्यांना प्रत्येकी दरमहा २० हजार भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.
आ. भाई जगताप, आ. प्रसाद लाड यांनी मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. धोकादायक इमारतीमधील भाडेकरूंना नोटीस देऊन जागा खाली करण्यास सांगितली आहे.
५९० गाळे तातडीने देण्यासाठी उपलब्धमुंबई महापालिका क्षेत्रात सध्या २०,३६३ संक्रमण गाळे उपलब्ध आहेत. त्यातील ५९० गाळे तातडीने देण्यासाठी उपलब्ध आहेत; पंरतु नोटीस देऊनही भाडेकरू स्थलांतरास तयार नाहीत. त्यासाठी त्यांनी स्वतःच निवासाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना दरमहा २० हजार भाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, १३ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १८० व २५० चौरस फूट आकाराचे फ्लॅट असलेल्या काही इमारती तीन वर्षांसाठी भाड्याने घेऊन ते संक्रमण शिबिर म्हणून वापरण्यात येणार आहेत, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.