Join us

‘त्या’ बेशुद्ध प्रवाशाला फुटपाथवर सोडणारे 2 सुरक्षारक्षक निलंबित; शिवनेरी प्रवासी लूटप्रकरणी एसटी महामंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 06:42 IST

१४ जून रोजी व्यावसायिक शैलेंद्र साठे शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईला येत होते. ही बस खालापूर येथे थांबताच आरोपी युनूस शफिकुद्दीन शेख (५२) याने त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले.

मुंबई : पुणे-मुंबई शिवनेरी बसमधील एका व्यावसायिकाला कॉफीतून गुंगीचे औषध देत त्याच्याकडील किमती ऐवज लुटल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. तसेच या व्यावसायिकाला बेशुद्धावस्थेत असताना रुग्णालयात नेण्याऐवजी फुटपाथवर सोडून देणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनाही निलंबित केल्याची माहिती आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मानवी हक्क आयोगाला दिली आहे.

१४ जून रोजी व्यावसायिक शैलेंद्र साठे शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईला येत होते. ही बस खालापूर येथे थांबताच आरोपी युनूस शफिकुद्दीन शेख (५२) याने त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. साठे बेशुद्ध होताच त्यांच्याकडील किमती ऐवज काढून घेत शेख आणि त्याचा साथीदार पसार झाला. ही बस दादरला येताच तेथील कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतील साठेंना उतरवून फुटपाथवर सोडून दिले. तेथे ते १६ तास बेवारस अवस्थेत होते. तेथे आलेल्या त्यांच्या मेहुण्यांना ते बेशुद्धावस्थेत दिसताच त्यांनी साठे यांना रुग्णालयात दाखल केले.  ८० तासांनी साठे शुद्धीवर आल्यानंतर  पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला अटक केली.

 लोकमतने या घटनेला वाचा फोडताच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने त्या वृत्ताची स्वतःहून दखल घेतली. या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली का, असा प्रश्न करत आयोगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्तांना याप्रकरणी १६ जुलैपर्यंत न्यायमूर्ती के. के. तातेड यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी दोन्ही कार्यालयातील अधिकारी आयोगापुढे हजर झाले.

 यावेळी आयोगाने एसटी महामंडळाकडे कारवाईबाबत विचारताच, त्यांनी साठे यांना फुटपाथवर ठेवणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांचे निलंबन केल्याची माहिती दिली.

 तक्रारदार साठे यांनी आपले म्हणणे मांडताना या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रतिनिधीने साधी चौकशीदेखील केली नसल्याची खंत व्यक्त केली.  या आयोगाने आता पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.