आठवड्यात २ हत्या करणारा गजाआड
By Admin | Updated: August 25, 2015 05:14 IST2015-08-25T05:14:20+5:302015-08-25T05:14:20+5:30
चार वर्षांपुर्वी शहापूर (नाशिक) आणि लोणावळा येथे दोन तरूणांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिताफीने गजाआड केले.
_ns.jpg)
आठवड्यात २ हत्या करणारा गजाआड
मुंबई : चार वर्षांपुर्वी शहापूर (नाशिक) आणि लोणावळा येथे दोन तरूणांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिताफीने गजाआड केले. संजय शंकर शेट्टीयार (२८) असे आरोपीचे नाव असून तो गेल्या चार वर्षांपासून फरार होता.
गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त केएमएम प्रसन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना २०११ जुलैच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. गोराईला राहाणारा संजय मोहिददीन शेख उर्फ गुडडू आणि शिवकुमार शेटटी उर्फ डीसूजा यांच्यासह त्र्यंबकेश्वर येथे गेला होता. तेथून मुंबईला परतण्यासाठी त्यांनी एका झायलो कारकडे लीफ्ट मागितली. प्रत्येकी शंभर रूपयात मुंबईला सोडेन असे सांगून ड्रायव्हरने तिघांना गाडीत घेतले. शहापूर, मोखाडीजवळ तिघांनी बहाणा करून गाडी थांबवली. पुढे त्यांनी चालक रघुनाथ आव्हाडचा गळा आवळून त्याची हत्या केली. आव्हडचा मृतदेह त्याच परिसरात हायवेजवळील झाडीत दडवून झायलो कार, मोबाईल व दागिने असा ७ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला होता. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून यापैकी गुडडूला अटक केली होती.
त्यानंतर अवघ्या आठवडयाभरात संजयने आपला काका शखेर चेटटीयार, गुडडू आणि लाला यांच्यासोबत सांताक्रुज परिसरात राहाणाऱ्या हरिश देढीया या हार्डवेअर व्यावसायिकाची हत्या केली होती. देढीया व्याजाने पैसे देत असे. त्यातूनच शेखरचा देढीयासोबत वाद होता. ११ जुलैला शेखरने देढीयाला आपल्यासोबत गाडीत घेतले. संजय, गुडडू, लाला हे तिघेही गाडीत बसले. या चौघांनी मिळून देढीयाची गळा आवळून हत्या केली. मृतदेह लोणावळयातील बॅटरी हिट येथील निर्जन ठिकाणी नेला. तेथे मृतदेहाचे मुंडके मोठया दगडी शिळेने झेजरले. पाच दिवसांनी लोणावळा पोलिसांना देढीया यांचे फक्त धडच सापडले. २३ जुलैला त्यांची ओळख पटली. त्यानुसार मृतदेह देढीया कुटुंबियांना देण्यात आला. या हत्याकांडात गुन्हे शाखेने अटक केलेला संजय हा पहिला आरोपी आहे. (प्रतिनिधी)