Join us

महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:30 IST

या क्षेत्रात संशोधन, उद्योजकता,  बौद्धिक संपदा निर्मितीला प्रचंड वाव आहे. यातून गुंतवणुकीचा ओघही वाढून राज्याला 'ग्लोबल डेस्टिनेशन' बनण्याची मोठी संधी आहे.

मुंबई : राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स व एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण २०२५ ला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणात

२०५० पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ३,२६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे राज्यात २० वर्षांच्या कालावधीत सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. तसेच या क्षेत्राशी निगडीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित २ लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.

'ग्लोबल डेस्टिनेशन'ची संधी

या धोरणांतर्गत एव्हीजीसी-एक्सआर पार्क विकसित केले जाणार आहेत. त्यातून या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या स्टार्टअप्स, एमएसएमई व मोठ्या घटकास प्रोत्साहन दिले जाईल.

या क्षेत्रात संशोधन, उद्योजकता,  बौद्धिक संपदा निर्मितीला प्रचंड वाव आहे. यातून गुंतवणुकीचा ओघही वाढून राज्याला 'ग्लोबल डेस्टिनेशन' बनण्याची मोठी संधी आहे.

जागतिक दर्जाचे पार्क राज्यभरात उभारणार

मुंबईतील फिल्म सिटी, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि नागपूर यासारख्या ठिकाणी या पार्कच्या विकासाचे नियोजन आहे.

हे पार्क हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटी, मोशन कॅप्चर स्टुडिओ, पोस्ट-प्रोडक्शन लॅब, हाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फार्म, साउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील.

सर्वाधिक स्टुडिओ महाराष्ट्रात

देशात कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये असे धोरण तयार करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही या क्षेत्रातील प्रमुख संस्था म्हणून काम करणार आहे.

राज्यात सध्या या क्षेत्रात २९५ हून अधिक स्टुडिओ आहेत. देशात सर्वाधिक म्हणजे ३० टक्के स्टुडिओ हे महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे येथे अँनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस आणि गेमिंगसाठीच्या शैक्षणिक सुविधा देणाऱ्या २० संस्था कार्यरत आहेत.

टॅग्स :नोकरी