२ लाख कर्करोग्यांना मिळाला आधार
By Admin | Updated: February 4, 2015 01:03 IST2015-02-04T01:03:51+5:302015-02-04T01:03:51+5:30
समाजच नव्हे तर नात्यातील मंडळींपासून दुरावल्या जाणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त नागरिकांसाठी गेली ४५ वर्षे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन वरदान ठरत आहे.

२ लाख कर्करोग्यांना मिळाला आधार
पूजा दामले ल्ल मुंबई
समाजच नव्हे तर नात्यातील मंडळींपासून दुरावल्या जाणाऱ्या कर्करोगाने ग्रस्त नागरिकांसाठी गेली ४५ वर्षे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन वरदान ठरत आहे. या व्याधीबाबत मोफत निदान, औषधांसाठी मदत, रुग्ण आणि नातेवाइकांचे समुपदेशन, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून पोषक आहार, रुग्णांचे पुनर्वसन करणे अशा सगळ्या बाजूने कर्करोग रुग्णांसाठी ही संस्था आधारवड बनली आहे. गेल्या २८ वर्षांत या संस्थेने या व्याधीने ग्रस्त झालेल्या १ लाखाहून अधिक रुग्णांना मोलाचा आधार देत त्यांंचे आयुष्य पुन्हा रुळावर आणले आहे, तर अडीच लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी केली आहे.
‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ ही एक फक्त कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गरज समजून घेऊन त्यांना मदत करणारी स्वयंसेवी संस्था आहे. येथे रुग्णांना गरजेनुसार मदत दिली जाते. रुग्णाला पैशांच्या स्वरूपात मदत केली जात नाही. रुग्णाला मिळणारी मदत ही मोफत असते. ही असोसिएशन भारतभर कार्यरत असल्याचे असोसिएशनच्या कार्यकारी संचालक नीता मोरे यांनी सांगितले.
‘लवकर निदान आणि जनजागृती’, ‘रुग्णांची काळजी घेणे’, ‘रुग्ण दत्तक योजना’, ‘रुग्णांसाठी रुग्णवाहिका’, ‘रुग्णांसाठी समुपदेशन’, ‘रुग्णांसाठी सकस आहार’, ‘रुग्णांना औषधांसाठी मदत’, ‘रुग्णांचे पुनर्वसन’ अशा विविध पातळ्यांवर ही असोसिएशन कार्यरत आहे. लवकर निदान होण्यासाठी १९८७ साली या असोसिएशनने निदान केंद्र सुरू केले आहे. जनजागृतीसाठी ‘ओपन फोरम’ हा कार्यक्रम राबविला जातो. तपासणी केंद्रात महिलांना स्वतपासणीचे प्रशिक्षण दिले जाते.
काही रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना औषधोपचाराचा खर्च करता येत नाही. अशा रुग्णांसाठी त्यांना लागणाऱ्या एकूण औषधांपैकी काही औषधे मोफत त्या रुग्णांना दिली जातात. औषधोपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या रुग्णांसाठी काही दाते शोधले जातात. हे दाते रुग्णांना दत्तक घेतात. दरमहा तीन हजारांहून अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मोफत समुपदेशन केले जाते. एखाद्या रुग्णाला रुग्णालयातून स्टेशनला अथवा ते उतरले असतील, त्या ठिकाणी रुग्णवाहिकेतून त्यांना सोडण्यात येते. रुग्णांना सकस आहार मोफत दिला जातो. बऱ्या झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना विविध वस्तू करायला शिकवले जाते. त्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे हे त्या रुग्णांसाठी आणि इतर रुग्णांच्या मदतीसाठी वापरले जातात.
दर महिन्याला साधारण ३० ते ४० नवीन रुग्ण दाखल होत असतात. तर दर महिन्याला २५० ते ३०० रुग्णांना ही असोसिएशन मदत करते. रुग्णांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये संगीताचा कार्यक्रम, एखादा सिनेमा दाखवणे, दोन दिवस फिरायला घेऊन जाणे, हेलिकॉप्टरमधून लहान मुलांना फिरवणे अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. स्तनाच्या कर्करोगावर उपचार झाल्यावर रुग्णांना कृत्रिम स्तन दिले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन भरवून आणि देणगीतून निधी जमविला जात असल्याचे सांगण्यात आले.
४५ वर्षांपूर्वी स्थापना
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनची स्थापना वाय.के. सप्रू यांनी १९६९ साली केली. गेली ४५ वर्षे ही संस्था कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. ही संस्था कर्करोगग्रस्त रुग्णांना फक्त मदतच करत नाही तर, त्याचबरोबरीने जनजागृती करणे, मोफत निदान, मोफत औषधे, नातेवाईक रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांचे पुनर्वसन करणे अशा प्रकारे कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत करत आहेत.