एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
By मनोज गडनीस | Updated: November 6, 2025 06:15 IST2025-11-06T06:14:07+5:302025-11-06T06:15:06+5:30
कुमार केतकर आणि विनय सहस्त्रबुद्धे हे दोघे एकमेकांसमोर लढणार

एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सन १८०४ पासून साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या यंदाच्या निवडणुकीत दोन माजी खासदार आमनेसामने उभे ठाकल्यामुळे या निवडणुकीत राजकीय रंग भरला आहे. येत्या ८ नोव्हेंबरला (शनिवारी) होणाऱ्या निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल नाडकर्णी यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता या दोन माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे.
एशियाटिक सोसाटयटीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा, तसेच कथित आर्थिक शिस्तीचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत चर्चेत आहे. दोन्ही बाजूंनी यावर भर देतानाच वाचन, बौद्धिक वैभव वृद्धिंगत करतानाच तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आकर्षक उपक्रम राबविण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, त्याहीपेक्षा उजवी व डावी विचारसरणी हाच प्रमुख मुद्दा निवडणुकीत असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत १,३०० नवीन सदस्य या संस्थेशी जोडले गेले. मात्र, या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, यासाठी एका गटाने धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली. यावर निर्णय देताना १,३०० सदस्यांना मतदान करता येणार नाही, असा निर्वाळा धर्मदाय आयुक्तांनी दिल्याने याचा फटका पुरोगामी गटाला बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ३,१२४ जुने आणि ३ ऑक्टोबरपर्यंतचे ३५५ असे एकूण ३,४८० सदस्य मतदानासाठी पात्र ठरले आहे.
मतदान वाढणार का?
एशियाटिक सोसायटीच्या मतदानाचा पूर्वानुभव फारसा चांगला नाही. एशियाटिक सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष प्रोफेसर विस्पी बालापोरिया यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबर २०२४ मध्ये झाली. त्यावेळी ३,५०० सदस्य मतदानासाठी पात्र होते. त्यावेळी केवळ १२५ सदस्यांनीच मतदान केले होते. यंदाची निवडणूक राजकीयच अधिक होत असल्याने मतदान वाढणार का हा उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे.