हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये ‘एसक्यूएस’ला २ एकर जागा
By Admin | Updated: April 14, 2015 01:51 IST2015-04-14T01:51:37+5:302015-04-14T01:51:37+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एसक्यूएस’ या कंपनीला हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी दोन एकर जागा देण्याचा निर्णय घेतला.

हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये ‘एसक्यूएस’ला २ एकर जागा
मुंबई : जर्मनीतील हॅनोव्हर व्यापारी परिषदेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एसक्यूएस’ या कंपनीला हिंजेवाडी आयटी पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी दोन एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. ‘एसक्यूएस’च्या गुंतवणुकीमुळे दोन हजार जणांना रोजगार मिळणार आहे.
जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेले फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सदर जागा देण्यासंबंधीचे पत्र ‘एसक्यूएस’च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. हॅनोव्हर येथील परिषदेत ‘महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी’ या विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मर्सिडिज बेन्झ या कंपनीला वर्षभर ज्या बाबींसाठी संघर्ष करावा लागला, त्याची पूर्तता आमच्या सरकारने अवघ्या १५ दिवसांत केली. एका कायद्याच्या क्लिष्टतेमुळे शिंडलर कंपनीची अवघी गुंतवणूक खोळंबली होती. सरकारने चुकीच्या आलेखनावर आधारलेल्या त्या कायद्यात १५ दिवसांतच दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात ५ महिन्यांत आणि देशात ११ महिन्यांतच उद्योग जगताला दोन्ही सरकारे जवळची वाटू लागली आहेत. ‘मेक इन महाराष्ट्रा’शिवाय ‘मेक इन इंडिया’ शक्य नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)